पुणे : उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने मंगळवारी (दि. 21) दुपारी साडे बारा वाजता मुंढवा, केशवनगर व मगरपट्टामधील काही भागात खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरळीत झाला.
याबाबत माहिती अशी की, हडपसर उपविभाग अंतर्गत व्यंकटेश ग्राफीटी 22/11 केव्ही उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर तांत्रिक बिघाडामुळे आज दुपारी 12.30 च्या सुमारास बंद पडला. त्यामुळे मुंढवा, केशवनगरसह मगरपट्टातील काही भागात वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. याबाबतची तसेच वीजपुरवठा पूर्ववत होण्याच्या संभाव्य कालावधीची माहिती वीजग्राहकांना मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देण्यात आली. महावितरणच्या चाचणी विभागातील अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सर्व तपासण्या व दुरुस्ती काम केले व चाचणी घेतल्यानंतर सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात यश मिळाले. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरवरून होणारा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.