मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांचे प्रतिपादन
पुणे : स्त्री सक्षम झाल्यास कुटुंबच नव्हेतर समाज व देशही बलशाली होतो. त्यामुळे कोणत्याही भेदभावाशिवाय महिलांना प्रगती करण्याची किंवा सक्षम होण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असे मत मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी व्यक्त केले.
रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. राजेंद्र पवार, श्री. वादिराज जहागिरदार, सौ. शिल्पा कुंभार, सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर) श्री. राजेंद्र म्हंकाळे, सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ञ डॉ. रूची ठाकूर व डॉ. मानसी कोठावदे यांनी महावितरण व महापारेषणच्या महिला कर्मचाऱ्यांना स्त्री आरोग्यावर मार्गदर्शन केले. तसेच आरोग्यविषयक विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. भक्ती जोशी यांनी केले तर सौ. अपर्णा मानकीकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. यावेळी महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आयोजनासाठी धनश्री कुबेर, जयश्री शेलोकार, वैशाली खरात आदींनी सहकार्य केले.