पुणे – कोणत्याही क्षेत्रात संघर्ष अटळ असतो. आज मुंबई – पुण्यासारख्या महानगरातील तंत्रज्ञ नवनविन तंत्रज्ञाना शोधण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्याचवेळी पुणसारख्या शहरापासून पन्नास किलोमीटरवरील गावातील लहान मुलगी शिक्षणासाठी संघर्ष करत आहे. आपल्या देशाच्या या दोन्ही सीमा असून तंत्रज्ञ, संशोधकांनी नविन तंत्रज्ञानासाठी संघर्ष करताना लहान मुलं, मुलींचाही सुरू असलेला संघर्ष न विसरता लक्षात ठेवावा असे आवाहन सायन्स अण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे विश्वस्त आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अरूण निगवेकर यांनी आज येथे केले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अण्ड ऍग्रीकल्चरच्या आसीसी टॉवरमधील सुमंत मूळगावकर हॉलमध्ये टेलिकॉम सेक्टर स्कील कौन्सील आणि बिस्की टेक्नॉलॉजि इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानाविषयी चर्चासत्रात बीजभाषण देताना डॉ. निगवेकर बोलत होते. यावेळी टेलिकॉम सेक्टर स्कील कौन्सीलच्या पश्चिम विभागाचे प्रमुख निवृत्त कर्नल प्रदीप जसवानी, बिस्की इंडियाचे अध्यक्ष निनाद देसाई, सल्लागार बालचंद्रन आदी मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्राला दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणा-या अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी, तंत्रज्ञ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्राच्या संयोजनासाठी टेलिकॉम सेक्टर स्कील कौन्सीलचे लोकल पार्टनर ऍस्पायर क्नॉलेज ऍण्ड स्कील्स इंडिया प्रा. लि.चे संजय गांधी यांनीही बहुमोल सहकार्य केले.
डॉ. निगवेकर म्हणाले, देशातील पहिला संगणक कोणा कंपनीने तयार केलेला नाही, तो पुणे विद्यापीठाने तयार केलेला आहे. त्यावेळी त्यासाठी काही लाख रूपयांचा निधी लागणार असल्याने पुणे विद्यापीठाने सीएसआयआर आणि हवामान विभागाची मदत घेतली. त्यासाठी संगणक तयार करताना मलाही बराच संघर्ष करावा लागला होता. अखेर पहिला संगणक तयार झाला आणि त्यामुळे आता त्यापुढे तुम्ही जागतिक पातळीवर तंत्रज्ञानासाठी संघर्ष करत आहात. लहान मुलांसाठी शिक्षणाचा मूलभूत अधिकाराचा कायदा करण्यासंबंधी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शिक्षण मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांना एक अहवाल पाठवला होता. त्यावर शिक्षणाचा अधिकार कायद्याला वाजपेयींच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली पण पुढे त्यांचे सरकार गेले. त्या जागी आलेल्या सरकारलाही या कायद्यासाठी जाग यायला 2013-14 साल उजाडले, त्यांनी तो कायदा केला आणि विद्यमान केंद्र सरकारने त्याला गती दिली आहे.
यावेळी पुणे – सोलापूर रेल्वे प्रवासात घेतलेला लहान मुलीचा अनुभव सांगून डॉ. निगवेकर म्हणाले, आज देशातील लहान मुलांच्या हातात मोबाइल म्हणा, संगणक म्हणा किंवा डाटा म्हणा काहीही म्हणा पण तो आहे. त्यांच्या तोंडात मोबाईल, नेट, डाटा यासारखे शब्द आहेत हे तंत्रज्ञ व संशोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. कारण जे काही नविन संशोधन केले जाईल त्याचा उपभोग घेणारी ही पिढी आहे. शेवटी हे संशोधन, तंत्रज्ञान जे आहे ते मानवासाठी मानवी कल्याणासाठी आहे हे लक्षात ठेवा असे त्यांनी स्पष्ट केले.
टेलिकॉम सेक्टर स्कील्स कौन्सीलचे प्रदीप जसवानी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कोणत्याही शिक्षणाच्या सुरूवातीपासून कौशल्य विकासाचे महत्व विद्यार्थ्यांपुढे मांडण्याचे काम शिक्षण तज्ञ आणि विशेषत:विद्याशाखेच्या लोकांनी केले पाहिजे. पदवीधर तरूणांना चांगले रोजगार सहजपणे मिळण्यासाठी ही कौशल्य विकासाची दरी भरून काढण्यासाठी या कौन्सीलने केलेल्या विविध उपाय योजनांची महिती दिली. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी भरून काढून दोघांनी संयुक्तपणे कौशल्य विकासासाठी काम करून टेलिकॉम जगतात निर्माण होणा-या संधी पदवीधर विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी काम करावे हा या चर्चासत्राचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.