पुणे : पुणे परिमंडलातील 3 लाख 74 हजार 377 वीजग्राहकांकडे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे 61 कोटी 59 लाख रुपयांची थकबाकी आहे. माहे एप्रिल/ मे महिन्याच्या देयकांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र देयक देण्यात आलेले आहे. सुरक्षा ठेवीच्या रकमेचा थकबाकीदार वीजग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. या ठेवीवर कालावधीनुसार बॅकेच्या बेस रेटनुसार व्याज देण्यात येते. पुणे परिमंडलात एकूण 4 लाख 66 हजार 855 वीजग्राहकांना 67 कोटी 43 लाख रुपयांची अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र देयके देण्यात आलेली आहेत. त्यातील 92,478 वीजग्राहकांनी 5 कोटी 84 लाख रुपयांचा भरणा केलेला आहे.
आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी एवढे देयक सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते. वीजग्राहकांनी मूळ सुरक्षा ठेव याआधी जमा केली असली तरी वीजदर, वीजवापर आणि पर्यायाने देयकांची रक्कम वाढलेली आहे. त्यामुळे मूळ सुरक्षा ठेव आणि गेल्या आर्थिक वर्षातील एका महिन्याचे सरासरी वीजदेयक यातील फरकाच्या रकमेचे देयक अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून ग्राहकांना देण्यात येते. अद्यापही ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव भरलेली नाही त्यांनी सुरक्षा ठेव भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. पुणे परिमंडलातील लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची माहिती तसेच ऑनलाईन पेमेंटची सोय महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.