श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे आयोजन ; उत्सवाचे २६२ वे वर्ष
पुणे : श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मानिमित्त गुरुवार, दिनांक ३० मार्च रोजी श्रीरामजन्माचा मुख्य कार्यक्रम (पाळणा) दुपारी १२.४० वाजता साजरा होणार आहे. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक आरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले यांनी दिली.
त्यापूर्वी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन होणार असून लगेचच सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे. पालखी मिरवणुकीचे स्वागत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून करण्यात येणार आहे.
संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले, विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६२ वे वर्ष साजरे होत आहे. याशिवाय शनिवार, दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.