पुणे :
भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज द्वारे आयोजित ‘न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’ ला चांगला प्रतिसाद मिळाला.२५ आणि २६ मार्च रोजी आयोजित या स्पर्धेत ७ आंतरराष्ट्रीय संघ आणि १३ राष्ट्रीय स्पर्धक संघानी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन २५ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या.हिमा कोहली यांच्या हस्ते झाले.स्पर्धेचे हे ११ वे वर्ष होते.भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम अध्यक्ष स्थानी होते.विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम ,कुलगुरू डॉ. विवेक सावजी,डॉ विवेक बेखोरो एलिअसक्रोव्ह,भारती विद्यापीठ विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेज च्या प्रभारी प्राचार्य डॉ उज्वला बेंडाळे हे मान्यवर उपस्थित होते.२६ मार्च रोजी स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ झाला . समारोप प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्या सी टी रवीकुमार,न्या सुधीर कुमार जैन,न्या डॉ नीला गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ उज्वला बेंडाळे यांनी स्वागत केले.
मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे योगदान:न्या हिमा कोहली
‘भारतात मानवी हक्कांच्या विस्तारात आणि संरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाची भूमिका बजावली असून भारताची त्यासंबंधी भूमिका अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर महत्वपूर्ण ठरली आहे’,असे प्रतिपादन न्या हिमा कोहली यांनी उदघाटनाच्या सत्रात बोलताना केले. त्या म्हणाल्या,’अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार हे भारतातील मानवी हक्कांच्या जपणुकीचे महत्वपूर्ण उदाहरण असून सर्वोच्च न्यायालयाने त्यासंबंधी वेळोवेळी सकारात्मक आणि संरक्षक भूमिका घेतली आहे.
‘भारतात मानवी हक्कांची जपणूक व्हावी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी यासंबंधीच्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आणि ऐतिहासिक निर्णय दिले आहेत.त्यामुळे मानवी हक्कांच्या व्याख्येचा विस्तार झाला आहे आणि बळकटी मिळाली आहे’.
‘तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीने काही वेळा मानवी हक्कांवर गदा येत असल्याचे चित्र दिसत असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स,फेशल रेकग्निशन,बायोमेट्रिक माहितीचे अनधिकृत हस्तांतरण ,सोशल मीडिया माध्यमातून होणारे शोषण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देखरेख ठेवणे, खासगी अधिकारांवर गदा आणणे, भेदभाव करणे दिसून येत आहे.त्याबाबत सर्वोच्च न्यायालय लक्ष ठेवून आहे. आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन होणार नाही यासाठी दक्ष आहे’,असेही त्यांनी सांगितले.