पुणे- वारज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोडके यांच्यासह 5-6 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. वारजे पोलीस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता वारजे भागात असलेल्या आरएमडी कॉलेज ते साई सयाजी नगर येथे एक अंडरपस (बोगदा) आहे. त्या ठिकाणी खडकवासला लोकसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काही काम चालू असलेल्या ठिकाणी सचिन दोडके, संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्ते पोहचले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि यातच संजय दोडके यांनी हातात बांबू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. तिथे सुरू असलेल्या कामगारांना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे.