ध्वनिप्रदूषण मोजणीच्या अंमलबजावणीवरून प्रदूषण नियंत्रण मंडळास पुणेकरांचा सवाल
पुणे, दि. 23 : गणेशोत्सव काळातील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पुणे शहरातील 200 ठिकाणी डेसिबल मीटरद्वारे ध्वनी पातळी मोजणी करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात या मोहिमेची आकडेवारी, दैनंदिन नोंदी किंवा त्यानंतरची कारवाई याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नसल्याने पुणेकरांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 तारखेपासून शहरात ध्वनी पातळीची मोजणी सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. दहा दिवस दररोज सायंकाळी 6 ते मध्यरात्री 12 या वेळेत विविध ठिकाणी ध्वनी पातळीची नोंद घेतली जाईल, तसेच आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांना प्रथम सूचना देऊन, त्यानंतरही उल्लंघन सुरू राहिल्यास पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते.
मात्र, या संपूर्ण मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, किती ठिकाणी मोजणी झाली, किती नोंदी घेण्यात आल्या, किती ठिकाणी आवाजाची मर्यादा ओलांडली गेली आणि त्यानंतर नेमकी कोणती कारवाई झाली, याची अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे “बातम्या आल्या, कंत्राट दिले गेले; पण काम कुठे आहे?” असा सवाल आता पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेही ध्वनिप्रदूषणाबाबतच्या अंमलबजावणीत त्रुटी असल्याचे नमूद करत रिअल टाइम मोजणी करण्यासह नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत मोजणीसाठी खर्च केला जात असतानाही संबंधित माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध न होणे, ही प्रशासनाच्या अनास्थेची बाब असल्याची टीका होत आहे.
यापूर्वी लाऊड स्पीकर विरोधी पुणेकर मंचाचे मुकुंद किर्दत आणि अशोक मेहेंदळे यांनी पुणे प्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले होते. ध्वनी मोजणीच्या नोंदी दररोज संकेतस्थळावर किंवा प्रसारमाध्यमांतून जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाही करू, असे आश्वासनही त्यांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस माहिती अथवा दैनंदिन अहवाल समोर आलेला नाही.
गणेशोत्सव संपल्यानंतर एक-दोन महिन्यांनी डेटा जाहीर करण्यात काही अर्थ नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी माहिती तत्काळ सार्वजनिक होणे आवश्यक असताना, तीच उपलब्ध होत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, “गणेशोत्सव काळातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मोजणीची घोषणा करण्यात आली, पण त्या मोजणीचा परिणाम, आकडेवारी आणि कारवाई काहीच समोर आलेली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होणार का, हा खरा प्रश्न आहे.”

