पुणे गुन्हे शाखेची हरियाणा–राजस्थानमध्ये कारवाई; तीन गावठी पिस्तुले आणि ३० काडतुसे जप्त
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील एका नामांकित व्यावसायिकाकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांच्या कंपनीच्या प्रवेशद्वारावर गोळीबार केल्याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.
२२ जून २०२६ रोजी संबंधित व्यावसायिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासांत दोन हल्लेखोरांनी व्यावसायिकाच्या कंपनीच्या गेटवर चार राऊंड गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण केली.
या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटवली. गुन्ह्यानंतर आरोपी परराज्यात पसार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाब येथे स्वतंत्र पथके पाठविण्यात आली.
सलग पाच दिवस विविध ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी २ जुलै रोजी राजस्थानमधून पवन प्रकाशराम बारड याला अटक केली. आरोपींना कंपनीतील माहिती पुरविणाऱ्या सत्यप्रकाश कालुराम शिलोरा या कामगाराला ४ जुलै रोजी पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.
यानंतर ७ जुलै रोजी पहाटे राजस्थानमधील हनुमानगड परिसरातून रविकुमार राजेंद्रकुमार जांगडा आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण तीन गावठी पिस्तुले आणि ३० राऊंड जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.
या कारवाईत पुणे शहर गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी समन्वय साधत परराज्यात शोधमोहीम राबवून आरोपींना जेरबंद केले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

