‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’मधून अखंड श्रद्धा आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचा जागर
मुंबई, : भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सोमनाथ मंदिराच्या गौरवशाली परंपरेचा जागर करणारा ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची १००० वर्षे’ हा विशेष सांस्कृतिक उपक्रम आज उत्साहात पार पडला. सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून रेल्वेमार्गे उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
“सोमनाथ मंदिर हे केवळ आस्थेचे केंद्र नसून राष्ट्रीय स्वाभिमान, सांस्कृतिक अस्मिता आणि भारतीय सभ्यतेच्या अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. इतिहासातील अनेक आक्रमणे आणि संकटांचा सामना करून पुनर्निर्माणाच्या माध्यमातून पुन्हा उभे राहिलेले सोमनाथ मंदिर भारतीय समाजाच्या अखंड श्रद्धा आणि जिद्दीचे प्रतीक मानले जाते.
या विशेष यात्रेत सहभागी नागरिकांना सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासह मंदिराचा वैभवशाली इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि भारतीय परंपरेतील महत्त्व यांची माहिती देण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संवाद सत्रे आणि भारतीय मूल्यव्यवस्थेवर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम मा. ॲड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास माननीय विधानसभा सदस्य श्री. संजय उपाध्ये, नगरसेवक श्री. शिवा शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच श्री. हर्षवर्धनसिंग रावत, अतिरिक्त कार्यकारी प्रबंधक, IRCTC आणि श्री. अमित करवंदे, अतिरिक्त वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे यांचीही विशेष उपस्थिती होती. मंत्री महोदयांनी उपस्थित राहून सहभागी नागरिकांशी संवाद साधत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच अभिजात कला, लोककला आणि भारतीय परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“अखंड श्रद्धा… अढळ स्वाभिमान… चला, सोमनाथच्या या दिव्य प्रवासाला!” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाने श्रद्धा, इतिहास आणि सांस्कृतिक जागरूकतेचा संगम अधिक दृढ केला. भारतीय संस्कृतीच्या अखंड परंपरेचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे दर्शन घडविणारा हा प्रवास सहभागींसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच सोमनाथच्या वैभवशाली इतिहास, अध्यात्मिक परंपरा आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या सांस्कृतिक वारशाचा अनुभव देणारा हा उपक्रम श्रद्धा, संस्कृती आणि इतिहास यांचा संगम अधिक दृढ करणारा ठरेल, अशी अपेक्षा श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी व्यक्त केली.

