मुंबई दि.१५: सलग पाचव्यांदा विधान परिषदेत बिनविरोध निवडून आल्यानंतर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवार दि.१४ मे रोजी, ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंदाश्रम व शक्तीस्थळाला भेट देत अभिवादन केले.
ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील आनंदाश्रमात जाऊन डॉ. गोऱ्हे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस चाफ्याचा पुष्पहार अर्पण केला. आनंदाश्रम येथील देवीच्या मूर्तीस वंदन करून फुलांचा हार अर्पण केला.
दिघे साहेबांच्या कार्याची आठवण काढताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, हिंदुत्वाचा विचार मांडणाऱ्यांना, विरोधाचा सामना करावा लागत असतानाच्या काळात धर्मवीर आनंदजी दिघे यांनी ठाणे, कल्याणसह अनेक भागांत शिवसेनेची विचारधारा ताकदीने रुजवली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांनी संघटना वाढवताना समाजातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धर्मवीरांचे खरे शिष्य असून शिवसेनेचा वारसा पुढे नेणारे नेतृत्व म्हणून ते कार्यरत आहेत. आनंदाश्रमातील वातावरण, धर्मवीरांची कार्यशैली आणि त्यांचे कार्यालय पाहताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “पाचव्यांदा विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर पुन्हा येथे येताना अंतःकरणाला वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळाल्यासारखे वाटले,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
याप्रसंगी, ठाणे महापौर शर्मिला पिंपोळलकर यांनी डॉ. गोऱ्हे यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना या भेटीवेळी, ठाणे महानगरपालिका महापौर शिवसेना शर्मिला पिंपोळलकर, उपनेत्या कला शिंदे, रिना मुदलियार, संपर्क प्रमुख कविता गावंड, ठाणे उपजिल्हा प्रमुख वंदना डोंगरे, यांच्यासह रंजना कुलकर्णी (लातूर संपर्क प्रमुख), सुरेखा गव्हाणे (शिर्डी संपर्क प्रमुख), संगीता चव्हाण (बीड संपर्क प्रमुख), सविता किवंडे (जालना-परभणी संपर्क प्रमुख), उज्वला भोपळे (अहिल्यानगर संपर्क प्रमुख), मुंबई विभाग प्रमुख राजश्री मांडविलकर, मालती हवालदार, शालिनी सुर्वे, मीना पानमंद, सुनीता वैती, रुची वाडकर, वैशाली सूर्यवंशी, स्वाती राणे, लता पाटील, कीर्ती मेश्राम, वर्षा जाधव, शालिनी देशपांडे तसेच सुधीर कुरुमकर (शिव कामगार सेना, पुणे) आणि राजू विटकर (झोपडपट्टी शहर प्रमुख, पुणे) उपस्थित होते.

