प्रख्यात साहित्यिक संजय सोनवणी यांनी उठविला आवाज …..

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे बुधवारी निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकारावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. हरी नरके यांनी गत जून महिन्यात आपल्या एका मित्राशी व्हॉट्सॲप संवाद साधला होता. त्यात त्यांनी लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या तब्येतीकडे कसे अक्षम्य दुर्लक्ष केले, हे नमूद केले होते. यामुळे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणावर टीकेची झोड उडते आहे.
हरी नरके यांनी लेखक संजय सोनवणी यांच्याशी बोलतानाही लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवले होते. संजय सोनवणी बुधवारी ‘माय मराठी’ शी बोलताना म्हणाले की, ‘प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांचा 22 जून 2023 रोजी मला व्हॉट्सॲप संदेश आला होता. त्यात त्यांनी डॉक्टरांच्या बेजबाबदारपणावर शंका घेतली होती.
हरी नरके आपल्या व्हॉट्सॲप संदेशात नेमके काय म्हणाले होते हे खाली जशास तसे वाचा…
“प्रिय भाऊ, नमस्कार
गुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊन
पुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे.
आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता.
ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला.
मात्र बीपी 60 90 असे लो असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो.
जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते.
हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता.
लीलावतीमधील नामवंत Cardeologist, pulminologist खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले.
लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला.
regards.
[14:29, 22/06/2023] Hari Narke 2:
हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे .. पण त्यांनी वाचलाच नाही.आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21पट झाला होता.
आता बरा होतोय.”
माझा हसता खेळता ज्येष्ठ बंधू गेला. काय म्हणू?
-संजय सोनवणी
दोषी डॉक्टरांवर कारवाई करा – सोनवणी
डॉक्टर प्राणदान करण्यासाठी असतात की प्राण घेण्यासाठी यावर गंभीर विचार झाला पाहिजे. डॉक्टरांनी lAB रिपोर्ट्सकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले. जवळपास 10 महिने त्यांच्यावर चुकीचे औषधोपचार झाले. यामुळे मूळ आजार बळावून हरिभाऊ अकाली गेले. यामुळे पुरोगामी विचारपर्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. हरिभाऊ राष्ट्रीय वैचारिक संपत्ती होते. त्यांचा मृत्यू सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे. दोषी डॉक्टर्सवर कायदेशीर कारवाई का होऊ नये?, असे संजय सोनवणी यांनी म्हटले आहे.
खाली फोटोत पाहा नरकेंनी पाठवलेला व्हॉट्सॲप संदेश
