नवी दिल्ली-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये जे घडले ते लज्जास्पद असून याबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला. भाजपने नऊ वर्षांत नऊ सरकारे पाडली, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी टीका केली.
मणिपूरवर बोलण्याआधी सुप्रिया सुळे यांनी अनेक मुद्द्यावरून केंद्रसरकारवर टीका केली. सरकारने घेतलेल्या भूमिकांचा विचार करता आम्ही या सरकारवर विश्वास कसा ठेवणार असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही हा अविश्वास प्रस्ताव आणला कारण आम्ही भारतीय नागरिकांचे प्रतिनिधी आहोत. सध्या लोकांच्या काय भावना आहेत हे आम्ही सांगू इच्छितो कारण आम्ही त्यांचे आवाज आहोत आणि हे आमचे कर्तव्य आहे, असे त्यांनी म्हटले. हा प्रस्ताव म्हणजे सध्याच्या भारतीयांच्या खऱ्या भावना असल्याचंही त्यांनी म्हटले.
सरकार कामाचा प्रचार करताना नऊ वर्षातील नवरत्ने याचा उल्लेख करत आहेत. पण मी सरकारच्या नवरत्नांबाबत सांगू इच्छिते असे म्हणत, सुप्रिया सुळेंनी समस्यांचा पाढा वाचला. राज्य सरकारांच्या कामामध्ये हस्तक्षेप, महागाई, एलपीजी सिलिंडरचे वाढलेले दर, देशातील महत्त्वाच्या संस्था मोडीत काढणे, जुमलेबाजी करणे, कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयश ही सरकारची नवरत्ने असल्याचे सुप्रिया म्हणाल्या. या नऊ वर्षात भाजपने विविध राज्यांमध्ये नऊ सरकारे पाडली त्यात महाराष्ट्रात दोनदा सरकार पाडल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देशात वाढलेल्या प्रचंड महागाईवरूनही सुप्रिया सुळेंनी सरकारवर जोरदार टीका केली. सध्या संपूर्ण देशामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. युपीएच्या सरकारच्या काळात 500 रुपयाच्या आत असलेली थाळी ही आता 1000 च्या वर पोहोचली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.सरकारची भूमिका ही कायम शेतकरी विरोधी राहिल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी कांद्याबाबत सरकारला वारंवार विनंती केली होती. कांद्याच्या निर्यातीची मागणी करत होते, कारण भारतात कांद्याचे अतिरिक्त उत्पादन होते आणि जागतिक बाजारात कांदा नव्हता. पण सरकारने तसे केले नाही. उलट दुधाचे भरपूर उत्पादन असताना दुधाची आयात केली. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणाले, पण त्याचे काय झाले. त्यामुळे जर सरकार शेतकरी विरोधी असतील तर आम्ही सरकारवर कसा विश्वास ठेवणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकारने वंदे भारत सुरू केले, पण त्याचबरोबर गरीब रथ रेल्वेही वाढवल्या असत्या तर आम्हीही कौतुक केले असते. कारण गरीब वंदे भारतमध्ये बसत नाहीत, तर गरीब रथ मध्ये बसतात. त्यात वंदे भारत अनेक ठिकाणी थांबेच नाहीत तर त्याचा फायदा काय. युपीएच्या काळात रेल्वे स्थानकांवर थांबत होत्या, आता फक्त रेल्वे स्थानकावरून जातात, असेही सुप्रिया म्हणाल्या.
देशाच्या आर्थिक स्थितीवरुनही सुप्रिया सुळेंनी टीका केली. देशावर असलेले कर्ज 2014 मधील 55.87 लाख कोटींवरून 155.6 लाख कोटींवर पोहोचले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी सरकार एलआयसी, आयडीबीआय विकत आहेत आणखी काय विकतील माहिती नाही, असे सुप्रिया यांनी म्हटले.
मणिपूरमध्ये सरकारची अत्यंत लज्जास्पद भूमिका समोर आली असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मणिपूरमध्ये 169 लोकांचा मृत्यू झाला 60 हजार लोक विस्थापित झाले. पण सरकार एवढे असंवेदनशील का झाले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केली. महिलांसोबत जे काही घडले ते कसे घडू दिले जाते, सरकार भूमिका का घेत नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारसमोर केवळ एकच उद्दिष्ट आहे ते म्हणते 2024 मध्ये सत्ता मिळवणे अशी टीकाही त्यांनी केली.

