मुंबई-अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. त्यातच गुरुवारी एका कार्यक्रमात ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.मुंबईत मनोरा आमदार निवासात 40 व 28 मजल्याच्या 2 इमारती बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही इमारतीत प्रत्येक फ्लॅट 1000 चौरस फुटांचा असणार आहे. त्यावर जवळपास 1300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या बांधकामाचा भूमीपूजन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. यावेळी एक किस्सा घडला अन् त्यावर काही वेळातच संपूर्ण राज्यात चर्चेची झोड उठली.
मनोरा आमदार निवास भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे तथा अन्य आमदार उपस्थित होते. यावेळी अजित पवार स्टेजवर आले आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले.
नेमके काय घडले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी हजर राहणार होते. पण ऐनवेळी ते आले नाही. यामुळे शिंदेंची गैरहजेरी आणि अजित पवारांनी थेट त्यांच्या खुर्चीचा घेतलेला ताबा या दोन्ही गोष्टींची राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा रंगली आहे.अजित पवार कार्यक्रमस्थळी पोहोचले तेव्हा ते व्यासपीठावरील आपल्या खुर्चीच्या दिशेने निघाले. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना मध्येच अडवून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्याची विनंती केली. पण पवारांनी त्यास नकार दिला. त्यानंतर नार्वेकरांनी खुर्चीवरील मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाचे स्टिकर काढून टाकले. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाले.या प्रसंगाची गरमागरम चर्चा रंगल्यानंतर राहुल नार्वेकरांनी माध्यमांना निरर्थक चर्चेला प्रोत्साहन न देण्याची विनंती केली. आज राज्यासाठी गौरवशाली कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री वैयक्तिक अडचणीमुळे या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यामुळे आपण निरर्थक गोष्टींना प्रोत्साहन देणे टाळले पाहिजे, असे ते म्हणाले.
अंबादास दानवेंनी काढला चिमटा
या प्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिश्किल प्रतिक्रीया दिली आहे. ‘मला असं वाटतं की, त्यांच्याकडेच सर्व निर्णय आहेत, त्यांच्या मनात काही असू शकतं’, अशी मिश्किल प्रतिक्रीया दानवेंनी दिली आहे.
मुख्यमंत्री का अनुपस्थित ..
याविषयी शिंदे यांचे समर्थक भरत गोगावले याना छेडले असते त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हा कार्यक्रम उरकून घेण्याचे सांगितले होते, असे सांगितले. गोगावले यांनी सांगितले की, अंगात ताप व कणकण असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाला येता आले नाही. आम्ही त्यांच्यासाठी थांबलो होतो. पण चौकशी केली, तेव्हा त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रम उरकुन घेण्यास सांगितले.

