सध्या महाराष्ट्रात डोळे येण्याची साथ सुरू आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात 1 लाखांहून अधिक जणांचे डोळे आलेत. विशेषतः ही साथ झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनानेही जनतेला डोळ्यांसंबंधी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
डोळे येण्याला इंग्रजीत conjunctivitis म्हटले जाते. हा एक वेगाने पसरणारा आजार आहे. हा आजार फार गंभीर स्वरुपाचा मानला जात नाही. पण हा एक संसर्गजन्य आजार असल्यामुळे तथा त्याचा थेट डोळ्यांसारख्या नाजूक अवयवावर परिणाम होत असल्यामुळे तो होणार नाही याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते.
महाराष्ट्रात सध्या व्हायरसमुळे डोळ्याचे रुग्ण प्रचंड वाढलेत. पावसाळ्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे व्हायरसला फोफावण्याची पुरती संधी मिळते. ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. त्यामुळे आपल्याला वारंवार घाम येतो. यामुळे आपण सातत्याने स्वतःचा चेहरा पुसत राहतो. असे करताना आपण डोळ्यांनाही हात लावतो. यामुळे आपसूकच संसर्ग होऊन डोळे येतात. 31 जुलैपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख रुग्ण डोळ्यांच्या आजाराने त्रस्त आहेत.
काय आहेत डोळे येण्याची लक्षणे?
- डोळे लाल होणे.
- डोळ्यांना पाणी येणे.
- डोळ्यांना सूज येणे.
- डोळ्यांतून चिकट द्रवपदार्थ स्त्रावणे.
- डोळ्यांना खाज सुटणे.
- डोळे जड वाटणे.
- डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटणे.
डोळे आल्यास कशी घ्यावी काळजी?
- डोळे स्वच्छ पाण्याने धुणे.
- इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपड्याने डोळे पुसू नये.
- डोळ्यांना सतत स्पर्श करु नये.
- घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
- संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घ्या.
- सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा.
- डॉक्टरांच्या सल्यानेच औषधे डोळ्यात टाकावी.
डॉक्टरांच्या मते, शाळा, वसतीगृहे, अनाथालय आदी संस्थात्मक ठिकाणी डोळ्यांची साथ आली असेल, तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला विलगीकरणात ठेवावे. डोळे येणे हा एक संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे तो एकापासून दुसऱ्याला झपाट्याने होतो. त्यामुळे नियमीत हात धुण्याची गरज आहे. डोळे आल्यानंतर स्टेरॉईड आय ड्रॉपचा वापर टाळावा. रुग्णांनी महापालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
रुग्णांची जिल्हावार आकडेवारी
- बुलडाणा -13,550
- पुणे- 8,808
- अकोला-6,125
- अमरावती- 5,538
- धुळे -4,743
- जळगाव-4,717
- गोंदिया 4,209
याशिवाय महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतही हजारो रुग्ण आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत महाराष्ट्रात 1 लाखांहून अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या मते, डोळे आल्यानंतर त्याचा परिणाम 3 दिवस राहतो.

