मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार कमळाचा प्रचार करताना दिसतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांच्या यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बावनकुळे यांना टोला हाणला आहे. बावनकुळे पंडित केव्हापासून झाले हे मला कळालेच नाही, असे ते म्हणाले.अजित पवार यांनी महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. ते शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. ते एवढ्यावरच थांबले नाही. काही ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेत त्यांनी पक्षावरही दावा सांगितला. या नव्या राजकीय मैत्रीवर भाष्य करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अजित पवार कमळासाठी मतदान मागतील असे विधान केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार कमळाचा प्रचार करतील. कमळाला मत द्या म्हणून भाषण करतील. कारण, आम्ही महायुती म्हणून एकत्र आलोत. त्यामुळे आम्ही सुद्धा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करू, असे ते रविवारी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील कार्यक्रमात संवाद साधताना म्हणाले. यावेळी त्यांच्या या विधानाला कार्यकर्त्यांनी खळखळून हसून दाद दिली. ते स्वतःही यावर खूप हसले.
बावनकुळे पंडित केव्हापासून झाले?
चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबल यांनी त्यांना उपरोधिक टोला हाणला. ते म्हणाले की, बावनकुळेंना सर्वकाही दिसत आहे. त्यांना भविष्यातीलही दिसत आहे. ते पंडित केव्हापासून झाले हेच मला कळत नाही. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच ते उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचाच प्रचार करतील.
दुसरीकडे, अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा गट भाजप प्रणित एनडीएचा अधिकृत सदस्य आहे. त्यानुसार, अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी एनडीएच्या बैठकांनाही हजेरी लावली आहे. त्यामुळे हा गट यापुढे महायुतीचा घटकपक्ष म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाईल, असा अंदाज आहे.

