कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरात व्यावसायिकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
पुणे-कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी लढत द्यायची असून या पार्श्वभूमीवर आज पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहर आणि जिल्हा जाहिरात व्यावसायिकांची बैठक घेतली . या बैठकीत जाहिरात व्यावसायिकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी महापालिका प्रशासक आमची पिळवणूक करत आहेत असे सांगितले .२०१८ मध्येच आयुक्तांनी मुख्यसभेला डावलून होर्डिंग व्यावसायिकांकडून ८२ रुपये चौरस फुटाचा दर २२२ रुपये केला आणि त्यांची वसुली २०१३ पासून केली.आणि आता २८ डिसेंबर २०२२ रोजी प्रशासक विक्रम कुमार यांनी तर कडी केली. त्यांनी हा दर ५८० रुपये चौरस फुट केला . साहेब सांगा हो कसं जगायचं आम्ही ? असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांना करण्यात आला . आणि त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केले आणि आपण तुमच्या अडचणी समजून घेऊ शकतो तुम्हाला निश्चित न्याय देऊ मात्र आता आचार संहिता असल्याने बोलता येत नाही . पण तुमची अडचण निश्चित सोडवू असे आश्वासन दिले .