गर्दीचे ठिकाणे, शाळा, महाविद्यालयांमध्ये जागर
पुणे, दि. ०६ जुलै २०२३: घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीज यंत्रणेपासून योग्य खबरदारी घेण्याची माहिती देत पुणे परिमंडलातील तब्बल १२ हजार नागरिकांशी महावितरणच्या ३७ वीजसुरक्षा दूतांनी थेट संवाद साधला. यासोबतच माहिती पत्रके व समाज माध्यमांद्वारे रिल्स, शॉर्ट फिल्म आणि छायाचित्रांद्वारे वीज सुरक्षेचा जागर करण्यात आला.
महावितरण व विद्युत निरीक्षक विभागाच्या वतीने दि. २६ ते २ जुलैपर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात महावितरणचे १८ प्रशिक्षणार्थी उमेदवार तसेच ‘नॉलेज शेअरिंग’ अंतर्गत सामंजस्य करार झालेल्या भारती विद्यापीठ तंत्रनिकेतन, शासकीय तंत्रनिकेतन व वाडिया तंत्रनिकेतनमधील १९ अभियांत्रिकी विद्यार्थी अशा ३७ सुरक्षा दूतांनी खास कामगिरी बजावली. पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण, राजगुरुनगर आदी शहरांसह विविध रेल्वे स्थानके, बसस्टॉप, मंदिरे, उद्याने व इतर गर्दीचे ठिकाणे, घरगुती वसाहती, सोसायट्या आदी ठिकाणी सुमारे १२ हजार नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप केले व थेट संवाद साधला. यासोबतच १० शाळा व ३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये खास वर्ग घेत उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांनी वीजसुरक्षेबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. या सप्ताहात वीजसुरक्षा दूत म्हणून थेट नागरिकांशी संवाद साधणारे ३७ अभियांत्रिकी विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी कौतुक केले.
महावितरण अंतर्गत या सप्ताहामध्ये १७५ अभियंते, २५० तंत्रज्ञ तसेच ७० यंत्रचालकांना वीजसुरक्षेचा प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, विद्युत निरीक्षक श्री. नितीन सूर्यवंशी यांच्यासह अनेक व्याख्यात्यांनी या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केले. चित्रपटगृहात वीजसुरक्षेची ध्वनीचित्रफित तसेच महावितरणकडे इमेल आयडीची नोंदणी करणाऱ्या राज्यातील सर्व ग्राहकांना इमेलद्वारे वीजसुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती पाठविण्यात आली. यासाठी देखील मुख्य अभियंता श्री. पवार व उपकार्यकारी अभियंता डॉ. पटनी यांनी पुढाकार घेतला.
मनोगत : श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल – वीजसुरक्षेचा जागर हा सामाजिक उपक्रम आहे. विद्युत अपघाताचा धोका अधिक असणाऱ्या पावसाळ्याच्या तोंडावर हा उपक्रम राबविण्यात आला. घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणच्या वीज यंत्रणेपासून सर्वांनी नेहमी सतर्क राहावे.

