मुंबई- आम्ही सत्तेत गेलो , साहेबांना वाईट वाटले असेल पण साहेब असेच वसंतदादा पाटलांनाही वाईट वाटले असेल अशा शब्दात काही मागच्या राजकारणाचे उल्लेख करत छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांना टोमणे मारले ते म्हणाले तुमच्या भोवतालच्या बडव्यांना बाजूला करा , आम्ही येतो सारे … जसा नागालँड मध्ये सत्तेत सहभागी होणाऱ्यांना आशीर्वाद देऊन त्यांचा सत्कार केला ,तसा साहेब आम्हालाही परवानगी देऊन आमचाही सत्कार करा असे छगन भुजबळ म्हणाले .
अजित पवार आणि त्यांच्या मातब्बर सहकाऱ्यांनी बंड करत उपमुख्यमंत्री पद घेऊन भाजपा बरोबर सत्तेत सहभागी झाल्यावर आज मुंबईत अजित पवार गटाची बैठक होत आहे सुरुवातीलाच भुजबळ यांनी भाषण केले ते म्हणाले ,’
मागील अनेक दिवसांपासून अजित पवारांनी मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आपला अध्यक्ष नियुक्त करण्याचा आग्रह धरला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळेच आम्ही वेगळी वाट निवडली, असा दावा छगन भुजबळ यांनी बुधवारी शरद पवार व जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधताना केला आहे. आम्ही सत्तासंघर्षाच्या निकालाचा अभ्यास करूनच वेगळी वाट निवडली. त्यामुळे आमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत व्यक्त केला.
काय म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी?
“मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा अनेकांनी आमिषं दाखवली. पण आम्ही गेलो नाही. शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलो आणि काम केलं. पण आता काय हा प्रश्न आहेच. साहेबांना (शरद पवार) वाईट वाटणं स्वाभाविक आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यापासून सगळी मंडळी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी तरळणं स्वाभाविक आहे.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे
शरद पवार आमचे विठ्ठल
“आम्हाला विचारलं जातं की शरद पवारांचा फोटो का वापरला? अरे, साहेब आमचे विठ्ठल आहेत, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या अशी माझी शरद पवार यांना विनंती आहे. मला एक सांगा ही सगळी मंडळी वेडी आहेत का? जी आमच्याबरोबर आली आहेत. आमच्या बरोबर आलेले काही लोक तर आमदार किंवा नामदारही नाहीत. पण तिथे (शरद पवार गट) काम करणारे पदाधिकारी या सगळ्याला जबाबदार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना नीट वागवायचं नाही.
आजही माझ्या मनात शरद पवारांविषयी प्रेम आहे. पण आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा वसंत दादांनीही असंच वाईट वाटलं. मी बाळासाहेब ठाकरेंसह होतो. मी त्यांना आई वडिलांच्या ठिकाणी मानत होतो. पण ३६ लोक तुमच्याकडे आले होते. तेव्हा मलाही येणं भाग पडलं. तुम्ही सांगितलं नाही की तिथे थांबा. मी तुमच्याबरोबर आलो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांनाही असंच वाईट वाटलं. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेतलं तेव्हा त्यांचे काका गोपीनाथ मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे यांनाही असंच वाईट वाटलं. या सगळ्याची पुनरावृत्ती झाली आहे. अजूनही काही बिघडलेलं नाही. अजित पवारांच्या नेतृत्त्वात आम्ही शेतकऱ्यांसाठी, ओबीसींसाठी, दलितांना न्याय देण्यासाठी काम करणार आहोत.” असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ यांनी शरद पवार आमचे विठ्ठल आहेत आणि त्यांना बडव्यांनी घेरलं आहे असं वक्तव्य करताच राष्ट्रवादीतले बडवे कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे यामध्ये येतात का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

