क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजन
पुणे : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंती निमित्त पुणेकरांच्या सहभागातून तब्बल दहा हजार किलोची मिसळ बनविण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर हे मिसळ बनवणार आहेत. या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक ११ आणि १४ एप्रिल रोजी गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा आणि पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ही मिसळ तयार करुन अभिवादनाकरीता येणा-या बांधवांना मिसळ वाटप करण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आहे, अशी माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात आली.
मंगळवार, दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे ५ हजार किलो मिसळ आणि दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ पासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ५ हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर म्हणाले, पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा आगळ्या – वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून १० हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
उपक्रमामध्ये १० हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी १००० किलो, कांदा ६०० किलो, आलं २०० किलो, लसूण २०० किलो, तेल ७०० किलो, मिसळ मसाला २६० किलो, लाल मिरची पावडर ५० किलो, हळद पावडर ५० किलो, मीठ ४० किलो, खोबरा कीस १४० किलो, तमाल पत्र १० किलो, फरसाण २४०० किलो, पाणी ८००० लिटर, कोथिंबीर १०० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
माजी आमदार मोहन जोशी, आमदार सुनील कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, मनसेचे नेते राजेंद्र वागस्कर, शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार, मनसे सरचिटणीस वसंत मोरे, पुणे मर्चंट बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, नगरसेवक अजय खेडेकर, अजित दरेकर, आरती कोंढरे, विष्णू हरिहर, प्रिया गदादे, पल्लवी जावळे, सुनील खाटपे, शिरीष मोहिते, प्रल्हाद गवळी, बाळासाहेब अमराळे, रवी चौधरी, सारंग सराफ, श्रीधर चव्हाण, चेतन धोत्रे यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे.