बारामतीला २७० कोटी देणाऱ्या राष्ट्रवादीने पुणे महापालिकेला दिला अवघ्या २८ कोटीचा तर पिंपरी महापालिकेला दिला अवघ्या साडेतेरा कोटीचा निधी …पुण्याचे २ आमदार विधानसभेत करतात तरी काय ?
पुणे- गेल्या अडीच वर्षात पुणे महानगरपालिकेला राज्य सरकारच्या माध्यमातून आपण किती निधी उपलब्ध करून दिला याचा तपशील द्यावा असे आवाहन माजी विरोधीपक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे , आमदार सुनील टिंगरे यांच्यासह खुद्द माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही केले आहे. बारामती नगर परिषदेला दिलेल्या 245 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे त्यावर राष्ट्रवादीने झोड उठविल्यानंतर केसकर यांनी हे आवाहन केले आहे.
केसकर म्हणाले,’ आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन बारामती नगर परिषदेला दिलेल्या 245 कोटी रुपयांच्या निधीला जी स्थगिती राज्य सरकारने दिली आहे त्याबाबत त्यांनी भेट घेतली. आमचा दादांना प्रश्न आहे गेल्या अडीच वर्षात पुणे महानगरपालिकेला राज्य सरकारच्या माध्यमातून आपण किती निधी उपलब्ध करून दिला याचा तपशील द्यावा.
का पुण्यावरच प्रेम हे “पुतना मावशीचे” प्रेम होतं असं आम्ही म्हणू ? स्वतःच्या मतदार संघातील नगर परिषदेला २७० कोटी आणि पुणेकरांना किती याचे उत्तर शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे यांनी पुणेकरांना द्यावं अशी आमची मागणी आहे .
याचबरोबर केसकर यांनी एक तक्ता प्रसिद्धीला पाठविला आहे यात बारामतीला २७० कोटी देणाऱ्या राष्ट्रवादीने पुणे महापालिकेला अवघ्या २८ कोटीचा तर पिंपरी महापालिकेला अवघ्या साडेतेरा कोटीचा निधी दिल्याचा दर्शविण्यात आले आहे. एकूण ३४० कोटीच्या निधीत बारामतीला २७० कोटी देऊन बाकीच्या महापालिका नगरपालिकांची कशी बोळवण करण्यात आली आहे ते हा तक्ता दर्शवितो असे केसकर यांनी म्हटले आहे.