पुणे:“श्रीनगर (काश्मीर) पासून चारपाचशे किलोमीटर अंतरावर, शून्य तपमान आणि बर्फाच्छादित हिमालयाच्या टेकडयांमधून आज खळाळता प्रसन्न प्रवाह असणारी सिंधुनदी वहाते आहे, हे आज किती भारतीयांना माहीत आहे? सिंधप्रान्त पाकिस्तानात गेल्यामुळे हिंदू शब्दाचे मूळ असणार्या पवित्र सिंधुलाहि आज भारत विसरला आहे. काश्मीरला जाणारे पर्यटकहि लेह-लड़ाखला जात नाहीत. त्यामुळेहि त्यांना सिंधू भेटत नाही. वयाच्या ८७व्या वर्षी सिंधुतीरावरील लेह-लड़ाखला जाऊन संध्यावंदनाचे भाग्य लाभल्यामुळे सर्व भारतीयांनी गंगा-यमुना-नर्मदा-कृष्णेप्रमाणे च सिंधुस्नानहि लडाखला जाऊन केले पाहिजे. यासाठी यापुढे मी यत्नशील रहाणार आहे.”असे एमआयटीच्या विश्व-शांति-गुरुकुलाचे कुलाचार्य, शारदा-ज्ञान-पीठम्चे पं. वसन्तराव गाडगीळ यांनी लडाख यात्रा करून येताच सांगितले. माउंटन ट्रेसचे श्री.राजीव गणपुले, युक्रांदच्या अरूणा देशपांडे आणि सांची बुध्दिस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. यज्ञेश्वर शास्त्री, संस्कृत प्राध्यापिका डॉ. सुनंदा शास्त्रीसह पं. गाडगीळ यांनी ही ‘यमुना-यात्रा’ केली.
सिंधु फक्त मंत्रातच का ?
श्री.लालकृष्ण अडवानी यांच्यामुळे १९९२ पासून दरवर्षी या महिन्यात लडाखच्या सिंधुतीरावर ‘सिंधु सम्मेलन-कुंभयात्रा’ होतात. त्यांना उपस्थिती असते ती फक्त सिंधमधून पाकिस्तानमुळे निर्वासित होऊन आलेल्या बहुसंख्य सिंधी बांधवांची. इतर भारतीयांनी मात्र फक्त प्रातःस्मरणांत मंगलाष्टकात, देवाला अभिषेक करताना
‘नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरू।’
असे मंत्रापुरते सिंधु नाव घ्यायचे पण सिंधुस्नान, सिंधु दर्शन, बर्फाच्या भीतीने टाळणे किती योग्य? असेहि पं. गाडगीळ यांनी विचारले आहे.
पं.गाडगीळ यांचा लेहच्या आंतरराष्ट्रीय बौध्द महासंघाचे संस्थापक भिक्खु महासंघसेन यांनी संस्कृतसाठी जीवनसमर्पणाबद्दल विशेष सत्कार केला.“अधिकाधिक भारतीयांना एमआयटी छात्र प्राध्यापकांना लेहला आणून पुणे-लेह स्नेह-सेतु सुदृढ करा”, असेही भिक्खुमहासंघसेन यांनी सांगितले.
भारतीय छात्र संसद आणि टीचर्स काँग्रेसचे प्रवर्तक एमआयटीचे उपाध्यक्ष प्रा राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शन-नेतृत्वाच्या संयोजनाने यापुढे दरवर्षी लड़ाख-हंगामाचे ४ महिने महाराष्ट्रातून आणि भारताच्या विविधभागातून छात्र आणि प्राध्यापक लडाखयात्रा करून सिंधु प्रवाहाच्या पावित्र्याचे भाग्य मिळवतील असेही त्यांनी सांगितले.