पुणे, दि.27 जाने.: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे तर्फे एक महान शांतीदूत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 69 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अयोध्या येथील रामजन्मभूमी बाबरी मस्जिदच्या दोन (2) ते अडीच (2॥) एकर जमिनीसहित शासनअधिग्रहित सुमारे साठ (60) एकर जमिनीबाबत एक सर्वमान्य तोडगा सुचविण्याच्या दृष्टीने ‘विश्वधर्मी श्रीराम मानवता भवना’च्या प्रस्तावित प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा आणि ‘आंतरधर्मीय समन्वय’ या विषयावर एका राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन सोमवार, दि.30 जानेवारी 2017 रोजी सकाळी 9.00 वाजता माईर्स एमआयटीच्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
सदरील लोकार्पण हे जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे, ज्येष्ठ विचारवंत मा. श्री. भाई वैद्य, माजी केंद्रीय मंत्री डॉ. अरिफ महंमद खान, ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे प्रमुख स्वामी आचार्य गोविंद गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे.
त्याचबरोबर, रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य आणि माजी खासदार डॉ. राम विलास वेदांती, सुप्रसिध्द मुस्लिम विचारवंत सय्यद कल्बे रिशेद रिझवी, माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ञ श्री. अविनाश धर्माधिकारी, अखेरचे मुघल बादशहा बहादूर शहा जफर यांचे पणतू श्री. नवाब शाह मोहम्मद शोएब खान, मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक श्री. मुकेश शर्मा, भारतरत्न अबूल कलाम आझाद यांचे वंशज आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते श्री. फिरोज बख्त अहमद, पंडित वसंत गाडगीळ, इस्लामचे गाढे अभ्यासक
श्री. अनीस चिस्ती, बौध्द धर्माचे गाढे अभ्यासक भन्ते राहुल बोधी महाथेरो, डॉ. रतनलाल सोनग्रा, ज्येष्ठ पत्रकार श्री. मुझफ्फर हुसेन, झोरास्ट्रियन कॉलेजच्या अध्यक्षा डॉ. मेहेर मास्टर मूस, डॉ. कुमार सप्तर्षी, हजरत निजुमद्दीन दर्गाहचे सैय्यद अझिज निजामी, डॉ. एडिसन सामराज, मौलाना वहिदुल्ला खान-अन्सारी-चतुर्वेदी, हजरत शेख बशीर अहमद बियाबानी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ब्रिटिश राजवटीपासूनच, भारत देशातील हिंदू-मुस्लिम धर्माच्या लोकांमध्ये कायम तेढ, तणाव, हेवेदावे, मत्सर आणि द्वेषभावना निर्माण करण्यात आली. सध्या आपल्या देशातील जातीवाद व विशेषकरून, हिंदू-मुस्लिम धर्मातील द्वेषभावना वाढीस लागल्याचे जाणवते आणि अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी-बाबरी मस्जिद सारख्या प्रश्नामुळे याचे भयावह परिणाम नजिकच्या भविष्यकाळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत, हे संशयाचे, तणावाचे वातावरण व द्वेषभावना, िवश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्या माध्यमातून दूर करण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आपल्या भारत देशात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, पारशी, बौद्ध, जैन अशा विविध धर्मियांमध्ये परस्पर सामंजस्य, प्रेम, बंधुभाव व सद्भावना कायम राहून, खर्या अर्थाने या पुढील काळातही सर्व समाजात सुख, समाधान, शांती राहावी या उद्देशाने, अयोध्या येथील ‘रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद’ येथील विवादास्पद जागेवर आणि शासन अधिग्रहीत सुमारे 60 एकर जागेवर सर्वधर्मसमावेशक असे ‘विश्वधर्मी श्री राम मानवता भवन’उभारण्यात यावे, असा प्रस्ताव विश्व शांती केंद्रातर्फे सुचविण्यात आला आहे.
प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थानीच म्हणजे ज्या ठिकाणी आज श्रीरामलल्लाची मूर्ती आहे, त्याच ठिकाणी, सुमारे दोन (2) ते अडीच (2॥) एकर जमिनीवर शुभ्रधवल अशा मकराना मार्बलमधील श्रीराम मंदिर व पवित्र श्रीमद् भगवद्गीता ज्ञानभवनाबरोबर, इस्लाम धर्माचे पवित्र कुराण ज्ञान भवन, बौद्ध धर्माचे पवित्र धम्मपद ज्ञान भवन, जैन धर्माचे पवित्र आगम ज्ञान भवन, झोरास्ट्रीयन धर्माचे पवित्र अवेस्था ज्ञान भवन, ज्यू धर्माचे पवित्र तोराह ज्ञान भवन, शिख धर्माचे पवित्र गुरुग्रंथसाहिब ज्ञान भवन व ख्रिश्चन धर्माचे पवित्र बायबल ज्ञान भवन ही सर्व धर्मांची प्रार्थनस्थळे भारत सरकारने अधिग्रहित केलेल्या सुमारे 60 एकराच्या विस्तीर्ण भूमीवर, 700 फूट गोलाकार अशा स्वरूपात, शुभ्रधवल मकराना मार्बलमध्ये लोकसहभागातून उभारण्यात येणार्या सुमारे 2,000 ते 2,500 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासह हे विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारण्याचा प्रस्ताव, विश्वशांती केंद्र (आळंदी)तर्फे सूज्ञ व जाणकार भारतीय जनतेच्या माहितीस्तव व विचारार्थ मांडण्यात येत आहे.
ऑक्टोबर 2010 मध्ये मा. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, विश्व शांती केंद्र (आळंदी)तर्फे सदरील विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाचा प्रस्ताव व संकल्प आराखड्याबाबत आजवर देशातील अनेक विद्वान, विचारवंत, तत्त्वज्ञ, राजकीय, सामाजिक व धार्मिक नेते आणि वेगवेगळ्या धर्मांवर श्रद्धा असणार्या मान्यवरांशी सविस्तर चर्चा केली गेली व यातील बहुतेकांकडून सदरील सर्वधर्मसमावेशक अशा विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे, सर्व सूज्ञ व जाणकार भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी व विचारार्थ आम्ही या विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाची त्रिमितीयुक्त प्रतिकृती तयार करून, कोथरूड येथील एमआयटीच्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात मांडली आहे.
आमची अशी प्रांजळ भावना आहे की, आपल्या भारत देशातील हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, झोरास्ट्रीयन, ज्यू ही सर्व भावंडे एकाच भारतमातेची लेकरे आहेत आणि ती खर्या अर्थाने गुण्यागोविंदाने, आनंदाने, सुख व समाधानाने राहायची असतील, तर श्रीरामजन्मभूमी-बाबरी मस्जिदसारखा संवेदनशील विषय सामंजस्याने आणि सर्वसंमतीने सोडवला जावा, यासाठी सर्व धर्मांना सामावून घेत, भारत देशातर्फे सार्या विश्वाला, ज्ञान-विज्ञानाधिष्ठित भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञानावर आधारित मानवतेचा आणि शांतीचा आगळावेगळा संदेश देण्यासाठी, सदरील विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाची संकल्पना मांडण्यात आली आहे.
अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड, जगप्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर आणि राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण आणि डॉ. संजय उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.