भारताने परराष्ट्र संबंधासाठी बौद्ध धर्माची मदत घ्यावी -लोबसंग सांगे
पुणे : “भारतापुढे आज खर्या अर्थाने जागतिकीकरण, उदारीकरण व आंतरराष्ट्रीयीकरण या समस्या आहेत. या समस्यांवर आज मात करण्याची भारताला गरज आहे. बौद्ध धर्म हा आज संपूर्ण आशियात पसरलेला आहे. मात्र त्याची परंपरा भारतातीलच आहे. आज भारत युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, हीच त्याची ताकद आहे.“ असे मत तिबेटचे पंतप्रधान लोबसंग सांगे यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या भारतीय छात्र संसदेच्या चौथ्या सत्रात भारताची नवी ओळख : एक जागतिक दृष्टीकोन या विषयावर ते बोलत होते.
याप्रसंगी जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. एम. जगदीश कुमार, श्री. अमितवा त्रिपाठी, सुप्रसिद्ध पत्रकार व राजकीय विश्लेषक डॉ. वेदप्रताप वैदीक, इराकचे राजदूत एच. एल. फाकरी, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. वेदप्रताप वैदीक म्हणाले, “आज जपानमध्ये देखील भारत गुरुंचा देश म्हणूनच ओळखला जातो. तसेच चीनच्या पश्चिमेकडील स्वर्ग अशीही भारताची ओळख आहे. शिक्षण हे स्वभाषेतच शिकवले जावे. परिस्थिती नव्हे, तर मन:स्थिती बदला. आज खरे तर दारुबंदी व भ्रष्टाचारासारख्या विषयांवर आंदोलने होणे गरजेचे आहे. कायद्याने नव्हे, तर मन:स्थितीमध्ये बदल घडवला तर भारत नक्कीच भ्रष्टाचारमुक्त होईल.
प्रा. एम. जगदीशकुमार म्हणाले, आज भारताला तीन अत्यंत महत्वपूर्ण गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधा, चांगले सरकार अर्थात सुशासन व आधुनिकता. आज भारताने विज्ञान व तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे. त्याच बरोबर संरक्षण, शेती, आरोग्य, शिक्षण व पर्यावरण रक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे.
प्रा. अमिताव त्रिपाठी म्हणाले, भारताजवळ माहिती तंत्रज्ञान, संरक्षण सिद्धता, आंतराळ संशोधन आणि औषध निर्माण ही शक्तीस्थळे आहेत. उत्कर्षासाठी आपण सागर संपत्ती व नौकानयनाच्या अर्थकारणाचा विकास केला पाहिजे. आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. त्याचा आपण उपयोग करुन घेतला पाहिजे. वाढ्ती आयात, सायबर सिक्युरिटी, विषमता आणि सीमेपलिकडून पोसला जाणारा दहशतवाद याचा अतिशय धोका आहे.
इराकचे भारतातील राजदूत महामहिम फक्री अल इसा म्हणाले, सध्या इराक दहशतवादी गटांच्या हल्ल्याला तोंड देत आहे. त्यांचे विचार मानवताविरोधी आहेत. काही छुपे बंडखोर त्यांना पाठिंबा देत असून शस्त्रे आणि इतर मदत करीत आहेत. इराकच्या सैन्याबद्द्ल टीका केली जाते. ते जामतवादी व क्रूर आहेत असे म्हटले जाते. हे सर्व आरोप इराकच्या बदनामीसाठी शत्रूंनी पसरविले आहेत. इसिस बरोबरची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. दहशतवदाचा बिमोड करण्यासाठी आमच्या सोबत असावे असे आम्ही आवाहन करतो.
श्रीमती नीलम शर्मा आणि प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.