मुंबई-राज्याचे क़ृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे आज पहाटे साडेचारच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्यांनी मुंबईतील सोमय्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.
पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन तपासणी केली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात नेण्यास सांगितले. पण, सोमय्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालविली होती.
बुलडाणा, खामगाव परिसरात भाजपला वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शेतकऱ्यांशी भाजपला जोडण्याचे काम फुंडकर करत होते. राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने होत असताना फुंडकर यांनी कुशलतेने ती हाताळली. सामान्य नागरिकांशी नाळ जोडलेला नेता अशी त्यांची ओळख होती.
भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेते म्हणून फुंडकर यांची ओळख होती. भाजपच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होता.