पुणे- बीआरटी चा फज्जा उडाला ,स्काय बस हवेतच विरली,आता मेट्रोचा ‘तमाशा’ सुरु आहे … भारतात जिथे जिथे मेट्रो आली आहे , तिथे तिथे , वाहतुकीची समस्या सुटली आहे काय ? तिथल्या नागरिकांना आता खाजगी वाहने ..मोटारी , दुचाक्या घेण्याची गरज उरलेली नाही काय? त्यांचे वाहतूकविषयक जीवनमान अगदी सुखकारक झाले आहे काय ? याचा शोध घेतला तर … मेट्रो हा केवळ बीआरटी नंतरचा आणखी एक भुलभुलैय्या आहे असेच स्पष्ट होईल .
भारतात सर्वाधिक स्वार्थी आणि मतलबी राजकारण जोपर्यंत होत राहील तोपर्यंत या देशाचे कधीही भले होणार नाही हे स्पष्ट आहे . किती जागेत, किती लोक राहावेत…या अनुषंगाने येथे शहरांची,गावांचा विकास होत नाही . जिथे अधिक लोकसंख्या आहे तिथेच निवडणुकीत मते मिळविण्यासाठी अधिक लक्ष दिले जाते. केवळ मतांच्या राजकारणासाठी विशिष्ट शहरांची भरमसाठ वाढ जर कोणी करीत असेल तर ते राजकारणी करीत आहेत. शहरांवर अब्जावधी रुपयांच्या विकास योजनांची बरसात करीत आल्याने … देशभरातील सर्व दुर्लक्षित गावांमधील लोक शहराकडे .. चरितार्था साठी धाव घेत आहेत .शहरांवर विकासकामांच्यासाठी होणारी पैशाची बरसात .. त्यामुळे शहरातच निर्माण होणारे उद्योग धंदे .. यामुळे मुठभर शहरे हीच माणसांसाठी पोट भरण्याची , पैसे कमविण्याची जागा ठरू लागली. तर देशाचा अन्य बहुतांशी भाग, अन्य गावे ही बिनकामाची ,उपासमारीची गावे होवून बसली आहेत . जिथे शेतीशिवाय अन्य कुठलाही मार्ग उरलेला नाही.
बीआरटी , मेट्रो या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणून त्यावर अब्जावधी रुपये खर्च करून देखील या शहराची वाहतूक समस्या पूर्णपणे सुटणार नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. ज्यांना सरकारकडून वा त्यांच्या संबधित घटकांकडून ‘काही’ मिळाले आहे ते आजपर्यंत सुरुवातीच्या काळात अशा प्रकल्पांची नेहमीच महती सांगत– कौतुकाची बरसात करीत स्वागत करीत आले.. पण ,त्यांनी असे प्रकल्प उधवस्त होताना टीकेची देखील बरसात केली आहेच. मात्र अशा मतलबीप्रवृत्तीनी, अशा फसव्या योजनांच्या उभारणीला सातत्याने बळ देण्याचे काम केले आहे .
मग नेमके काय करायचे ? असा सवाल कोणी उपस्थित करतील . समस्या सोडविण्यासाठी काही करायचेच नाही काय ? असे देखील विचारतील .. साहजिक आहे .
पण याचे उत्तर महात्मा गांधी , आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वीच देवून ठेवलेले आहे . ज्याकडे सातत्याने राजकारणी दुर्लक्ष करीत आले आहेत .
सध्याचे याचे उत्तर असे असेल कि,शहरात नवे प्रकल्प आणूच नयेत. तोच अब्जावधीचा पैसा .. खेड्यांवर खर्च करावा . म्हणजे नेमके काय, काय करावे तर , रस्ते , पाणी, वीज यावर प्रथम खर्च करावे. दळणवळण आणि मुबलक पाण्याच्या साठ्यासाठी धरणे , आणि अखंडित वीज पुरवठा या प्राथमिक गरजा पूर्ण केल्या तर आपोआप .. उद्योगधंदे तिथेच सुरु होतील आणि शेतीबरोबर अन्य स्वरूपाची रोजगार निर्मिती तिथेच होईल .एकीकडे खेड्यातच रोजगार आणि दुसरीकडे शहरांच्या वर होणारी विकास प्रकल्पांची बरसात थांबली तर आपोआप शहरांच्या वाढीला मर्यादा पडतील . आणि अशी मर्यादा पडली तर वाहतूक समस्या हि निर्माण होणार नाही. आणि नागरिकांवर मोटारी घेवू नका , दुचाक्या घेवू नका अशी हुकुमशाही सक्ती करण्याची वेळ येणार नाही .
सर्वात महत्वाचे म्हणजे देशाची लोकसंख्या विशिष्ट मुठभर शहरातच विभागली जाणार नाही तर ती देशभरातील विविध गावांमध्ये समप्रमाणात विभागली जाईल अशा पद्धतीचे धोरण राबविले तर .. माणसाचे जीवन सुखदायी होईल. म्हणजे आज ३०० चौरस फुटाच्या जागेत १० माणसांचे कुटुंब राहत असेल तर ते अधिकचा 1 पैसाही खर्च न करता ३००० चौरस फुटाच्या जागेत हि १० माणसे राहतील . आणि देशातील विविध गावे नाही तर विविध सुंदर सुरेख शहरांची निर्मिती होईल .
देशातील जनता मुठभर शहरात राहता कामा नये तर ती अनेक विविध शहरात विभागली गेली आणि त्या अनुषंगाने पैसा खर्च केला तरच या देशाचे सुंदरबन होईल अन्यथा देश बकाल आणि मुठभर शहरे सुंदरतेच्या नावाने समस्यांनी ग्रस्त असे चित्र कायम राहील .