पुणे :
‘बाह्य जगतातील हिंसाचार, बीभत्सपणा, भ्रष्टाचार, धिंगाणा अशा आघातांचे मानसिक पडसाद लहान मुलांवर उमटत असून मानसिक आरोग्य बिघडून चिडचिड, भावना शून्यता, बेजबाबदारपणा असे परिणाम त्यांच्या वागण्यात दिसत आहेत, अशा वेळी आईवडिलांनी शिक्षक होणे आणि शिक्षकांनी आई वडील होणे आवश्यक आहे’ असे उद्गार समुपदेशक घनश्याम शिंदे यांनी काढले.
‘महात्मा गांधी सप्ताह’ निमित्त ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ तर्फे आयोजित ‘मुलांच्या समस्या आणि पालकांसमोरील आव्हाने’या व्याख्यानात ते बोलत होते. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. उर्मिला सप्तर्षी यांच्या हस्ते घनश्याम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. गांधीभवन येथे मंगळवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. पालकांनी या कर्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
घनःश्याम शिंदे म्हणाले, ‘आताच्या पिढीचा बुध्दयांक चांगला आहे, त्यांच्या हातात वेगवान तंत्रज्ञान आणि माध्यमे आहेत. ग्रहण क्षमता अफाट आहे मात्र, त्यांचा भावनांक (इमोशनल कोशंट) कमी आहे. बाह्य कारणांमुळे त्यांचे भावनिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे हुशार असून, अभ्यास न करणे, सतत संगणक किंवा मोबाईलवर खेळत राहणे, एका जागी स्थिर नसणे, मनासारखे न झाल्यास आदळआपट करणे असे परिणाम दिसत आहेत. अशावेळी त्यांचे भावनिक संतुलन राखण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आईवडिलांनी शिक्षक होणे आणि शिक्षकांनी आई वडील होणे आवश्यक आहे. पालक आणि शिक्षकांचे समुपदेशन करणेही आवश्यक आहे.
मुले घरात कोणते कार्यक्रम टीव्हीवर पाहतात, कोणत्या जाहिराती पाहतात आणि हिंसात्मक खेळ संगणक-मोबाईल -टॅबवर खेळतात का हेही पाहणे महत्वाचे आहे. बाहेरच्या जगातील नकारात्मक परिणाम रोखण्यासाठी घरातील -शाळेतील वातावरण सकारात्मक, प्रेमळ वागणुकीने भरून टाकण्याची गरज आहे.
लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे, त्यावरील बंधने काढून टाकणे आवश्यक आहे. खेळण्यातील शस्त्रे कमी करण्याची गरज आहे. समाजात कसे वागावे हे त्यांना सांगत असताना पालकांनाही त्यांची कर्तव्ये समजावून सांगणे महत्वाचे ठरेल.