पुणे: गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद होऊन पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर ०३ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री पालघनने वार करून खून केल्याची घटना पुणे येथील कोंढवा परिसरात घडली होती. यामध्ये महेश लक्ष्मण गुजर या तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी अमर कैलास गव्हाणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली होती.
या प्रकरणी सोनी गुजर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. कोंढवा पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेऊन पाच जणांवर गेल्यावर्षी चार ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. फिर्यादी सोनी गुजर आणि आरोपी अमर कैलास गव्हाणे शिवनेरी नगर परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी महेश गुजर यांच्या गाडीचा धक्का आरोपी अमर कैलास गव्हाणे याला लागला होता. त्याचा राग मनात धरून आरोपींनी महेश गुजर याच्यावर पालघनने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. अशी बाब तपासात निदर्शनास आली. या प्रकरणातील आरोपी अमर कैलास गव्हाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. अनिकेत निकम यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात ॲड. अनिकेत निकम यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील ॲड. सुधीर पाटील यांनी सहकार्य केले.
या प्रकरणात ॲड. अनिकेत निकम यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे युक्तिवाद करताना कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, गेल्या सोळा महिन्यांपासून पासून आरोपी हा तुरुंगात आहे. परंतु अदयापही खटला सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. त्याच बरोबर आरोपीने प्रत्यक्ष मारहाण केलेली नाही. केवळ सह-आरोपीच्या जबाबावरून आरोपीला गंभीर गुन्ह्यात गुंतविले आहे. ॲड. अनिकेत निकम यांनी साक्षीदारांच्या जबाबामध्ये असणारी विभिन्नता आणि विसंगती उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे आरोपीकडून कोणतीही वस्तू/हत्यार जप्त करण्यात आलेले नाही तसेच आरोपीचा यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसल्याचा व तशी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले.
सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करताना कोर्टापुढे युक्तिवाद केला की, आरोपीला यापूर्वी तडीपार करण्यात आलेले होते. तसेच आरोपी हा प्रत्यक्ष घटनास्थळावर होता हे सी.सी.टी.व्ही. मधून दिसून येते. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी केली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून ॲड. अनिकेत निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अमर गव्हाणे याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला.

