पुणे, दि. ३ जानेवारी : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शक्षिण संस्था समूह, पुणे, भारततर्फे १०वींच्या (एसएससी व सीबीएसई) हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती’ (स्कॉलरशीप) ही अभिनव योजना जाहीर करण्यात आली आहे. या वर्षी ही परीक्षा सोमवार दि. २७ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व परीक्षेचे समन्वयक डॉ. एस.एन.पठाण आणि माईर संस्थेच्या महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे यांनी दिली.
आयोजित परीक्षा दोन भागामध्ये म्हणजे पहिला पेपर स. ११ ते दुपारी १ आणि दुसरा पेपर दुपारी ३ ते ५ या दरम्यान होईल. या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ३ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या १०वीं च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोकण (मुंबईसह), उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या पाच विभागात २७ जानेवारी रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील वरील पाच विभागातील, प्रत्येक विभागातून गुणानुक्रमे पहिल्या नऊ विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती स्कॉलरशिप २ वर्षासाठी (११वीं आणि १२वीं साठी) असेल.
यशस्वी विद्यार्थ्यांतील पहिला क्र. २५,००० प्रतिवर्ष, दुसरा क्र. २०,००० प्रतिवर्ष , तिसरा क्र. १५,००० प्रतिवर्ष, चौथा क्र. १०,००० प्रतिवर्ष, आणि उत्तेजनार्थ पुरस्कारामध्ये सहावा क्रमांक ५ हजार, सातवा क्रमांक ३ हजार, आठवा क्रमांक २ हजार आणि नववा क्रमांक १५०० प्रतिवर्ष देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी १०वीं आणि ११वीं मध्ये किमान ७० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. प्रत्येक विभागातील ९ यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि पदक देण्यात येईल. विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती परीक्षा ही आपापल्या मान्यताप्राप्त शाळेत घेतली जाईल. परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यास मुख्याध्यापकांची शिफारस असणे आवश्यक आहे. सदरील परीक्षा घेणार्या प्रत्येक शाळेतर्फे त्या केंद्रावर किमान ३० विद्यार्थी बसणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी नोंदणी फी नाममात्र १०० रूपये आहे. या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी ठरवण्यासाठी मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा दरवर्षी घेतली जाणार आहे.
ही शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यामागील संकल्पना, हेतू व भावना ही वैश्विक मूल्यांचा अंगिकार करून, विद्यार्थ्यांनी विश्वशांती आणि मानव कल्याणासाठी कार्य करावे आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूळ भारतीय परंतु वैश्विक कल्याणासाठी असलेल्या संकल्पनेसाठी कार्यरत राहून, स्वामी विवेकानंदांनी उच्चारलेल्या विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधण्याचे कार्य करावे असा आहे.
या संदर्भातील विस्तृत माहिती या https://wpcvalue-education.com संकेतस्थळावर तसेच, मो. नं. ९४०३१३१२३१ वर संपर्क साधू सकता.