महोत्सवाच्या तयारीच्या दृष्टीने आयोजित केलेली अभ्यासक, तज्ज्ञ, प्राध्यापक, साहित्यिक, लेखक, कवी, कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात संपन्न
पुणे; ०८ डिसेंबर : ‘लेखन, वाचन, चिंतन, संशोधन ही समाजाला सकारात्मक करणारी क्षेत्रे आहेत. पुणे या क्षेत्रांची प्रयोगशाळा असून, संपूर्ण जग या शहराचे अनुकरण करते. पुण्याचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे, तसा यंदाचा पुणे पुस्तक महोत्सवही विश्वविख्यात होईल,’ असा विश्वास राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर ‘पुणे पुस्तक महोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनाची व्यापक बैठक रविवारी सायंकाळी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर येथे पार पडली. या प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, अभिनेते-लेखक प्रवीण तरडे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ‘एनबीटी’चे सहायक संचालक (प्रदर्शन) मयांक सुरोलिया, संयोजन समितीचे सदस्य बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, प्रा. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर आदी उपस्तित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा ‘पुणे पुस्तक महोत्सव’ चौपट मोठा होणार असून, त्याद्वारे पुस्तक प्रदर्शनांच्या जगतात नवा विश्वविक्रम प्रस्थापित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, त्यांनी नागपूर येथेही अशाच पुस्तक महोत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाचे अनुकरण सर्व शहरांना करावेसे वाटत आहे,’ असे समाधानही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, ‘यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाराशे महाविद्यालय-संस्थांमधील साडेसात लाख विद्यार्थी सक्रिय सहभागी होणार आहेत. या महोत्सवातून होणारी पुस्तक विक्री, तसेच ‘शांतता पुणेकर वाचत आहेत,’ या उपक्रमातून कोणत्या वयोगटाचे वाचक काय वाचतात, त्यांची आवड-निवड काय, त्यातून वाचन संस्कृती कशी जोपासली जाते, याचा महत्त्वपूर्ण ‘डेटा’ उपलब्ध होईल.’
डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, ‘‘पुणे पुस्तक महोत्सव’ ही एक वाचन चळवळ असून, त्यातून नवा पायंडा पाडण्याची संधी पुण्याला आहे. ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’ नंतर ‘पुणे पुस्तक महोत्सवा’कडे साहित्य संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने पाहिले जात असून, लवकरच हा देशातील पहिल्या क्रमांकाचा पुस्तक महोत्सव होईल.’
प्रवीण तरडे म्हणाले, “पुणे पुस्तक महोत्सव’ हा पुण्याच्या मूळ संस्कृतीशी जोडलेली नाळ असून, सारस्वतांच्या पंढरीची नामदेवांची पायरी आहे. पुस्तकांच्या या कुंभमेळ्यात पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या पुणेकरांनी साहित्य स्नान करावे. त्यातून पुणेकर हे साहित्यप्रेमी असल्याची हरवलेली ओळख पुन:प्रस्थापित होईल.’
राजेश पांडे म्हणाले, “पुणे पुस्तक महोत्सव’ हा पुणेकरांचा महोत्सव असून, त्यामध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवून संघशक्तीच्या जोरावर ही वाचन चळवळ यशस्वी करावी. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या भव्य प्रवेशद्वाराचे येत्या १० डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते अनावरण केले जाणार आहे, तसेच येत्या ११ डिसेंबरला ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम होणार असून, त्यामध्ये प्रत्येकाने दहा पुणेकर वाचकांना जमवून पुस्तकांचे वाचन करावे. शहराचे प्रमुख चौक, महाविद्यालये-शाळा, महापालिकेसह शासकीय कार्यालय, मेट्रो या ठिकाणी हा उपक्रम करून अधिकाधिक वाचकांना पुस्तकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.
बागेश्री मंठाळकर यांनी महोत्सवाच्या नियोजनासाठी निर्माण केलेली खाती व खातेप्रमुखांची माहिती दिली. ‘हा महोत्सव जगन्नाथाचा रथ असून, शेकडो कार्यकर्त्यांच्या जोरावर तो यशस्वी होईल,’ असे त्या म्हणाल्या.
डॉ. आनंद काटीकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘काव्य-शास्त्र-विनोदाने परिपूर्ण अशा या महोत्सवात सर्व पुणेकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला.