पुणे, दि. 2: महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची भूमी असून त्याला समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे; न्यायपालिकेत पुरोगामी राज्याला सुसंगत अशी भूमिका मध्यस्थींनी घ्यावी, न्यायानंतर संबंधित व्यक्तींच्या चेहऱ्यावर आंनद व समाधानाची भावना दिसली पाहिजे, यादृष्टीने काम करावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे (नालसा) कार्याध्यक्ष भुषण गवई यांनी केले.
पुणे येथे 30 नोव्हेंबर रोजी आयोजित एकदिवसीय विभागीय मध्यस्थी परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती तथा महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे कार्याध्यक्ष अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती रेवती मोहिते-ढेरे, रवींद्र घुगे, नितीन सांभरे, भारती डांगरे, अमित बोरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई चे सदस्य सचिव समीर अडकर. तसेच चेतन भागवत, श्रीपाद देशपांडे, सागर इंगळे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील आदी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती गवई म्हणाले, भारतीय राज्यघटनेत न्यायाचा हक्काला मुलभूत हक्क मानला आहे. देशात महाराष्ट्राची न्यायपालिका देशात अतिशय चांगली न्यायपालिका म्हणून ओळखली जाते, याचा आम्हाला अभिमान आहे. देशात विविध कायदे निर्माण करुन गावागावातील तंटे सर्वांनुमते मिटवून सकारात्क मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मध्यस्थींनी दोन व्यक्ती, संस्थामधील मतभेद दूर करुन समान न्याय मिळेल यादृष्टीने प्रयत्य करावे. न्यायपालिकेत व्यक्तींना न्याय देतांना तो कमी वेळेत व कमी खर्चासोबतच चांगल्यारितीने न्याय देण्यावर भर दिला पाहिजे, हे उद्दिष्ट साध्य करण्यावर सकारात्म दृष्टीकोन अंगीकारत मध्यस्थीची महत्वाची भूमिका पार पाडावी. राज्यात मध्यस्थीची सुरू असलेली चळचळ यशस्वी करण्याकरीता प्रयत्न करावे. याकरीता अंगी इच्छा, तळमळ असावी लागते, असेही न्यायमुर्ती गवई म्हणाले.
श्री. वराळे म्हणाले, पुणे ही संताची भूमी असून या भूमीला संताची शिकवण लाभलेली आहे. समाजात विषमता दूर करुन समता प्रस्थापित करण्यासोबच वंचिताना न्याय देणे ही संताची शिकवणीप्रमाणेच आपल्या संविधानाचे तत्व आहे. यादृष्टीने समाजातील वंचिताना न्याय देण्यासोबतच विषमता दूर करण्याकरीता प्रयत्न करावे. नालसा उद्धघोष गीताच्या माध्यमातून ‘न्याय सर्वांसाठी’ ही संकल्पना सर्वत्र रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातून विधीसेवेचा उद्देशही व्यक्त होत आहे, असेही श्री. वराळे म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे (मालसा) मराठी भाषेतील उद्धघोष गीत, मध्यस्थी हस्तपुस्तिका तसेच विधी सेवा हस्तपुस्तिकेचे अनावरण करण्यात आले त्याच बरोबर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या समाज माध्यमांचे ई-लोकार्पण करण्यात आले.