पुणे :
मनुष्यबळ विकास (एचआर)आणि व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘ओएचआर फाउंडेशन ‘च्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या ‘अनटोल्ड स्टोरी: सर्जिकल स्ट्राईक – उरी’ या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.निंभोरकर हे उरी सर्जिकल स्ट्राईकमधील नेतृत्वासाठी प्रसिद्ध आहेत.
हे व्याख्यान शनिवार,दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता, काळे सभागृह, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, बीएमसीसी रस्ता, (डेक्कन, पुणे)येथे झाले.प्रवेश मोफत होता.फाउंडेशनतर्फे वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी प्रेरक व्याख्यानांचे आयोजन केले जाते.
जितेंद्र पेंडसे यांनी प्रास्ताविक केले, उपक्रमांची माहिती दिली. महेश करंदेकर,मिलिंद काळे, बिपीन घाटे ,प्रशांत इथापे, विश्वस्त उपस्थित होते. सुक्रीती छेत्री यांनी सूत्रसंचालन केले.
राजेंद्र निंभोरकर म्हणाले,’उरी सर्जिकल स्ट्राईक पहाटे करताना भारतीय सैन्यदलाने अचूक नियोजनाचा कळस करून दाखविला.अशा कामगिरीच्या वेळी सर्व प्रकारच्या हानी बरोबरच देशाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते.मनोहर पर्रीकर यांच्यासारखा संरक्षणमंत्री असल्याने उरी सर्जिकल स्ट्राईक करणे हे शक्य झाले.त्या हल्ल्याचे थर्मल कॅमेर्याने चित्रीकरण केल्याने तो स्ट्राईक फर्जिकल नव्हता,हे सिद्ध करता आले. भारताने ही कामगिरी यशस्वी केल्याने जगात मान उंचावली. त्यानंतर २६/११ सारखे प्रकार झाले नाहीत.उरी पेक्षा मोठ्या गोष्टी करणे भारताला शक्य आहे.पण,त्या कोणत्या हे कोणीही सांगू शकत नाही.
मनुष्य बळ विकास हे अतिशय अवघड काम आहे.ते कौशल्यपूर्ण पद्धतीने करावे लागते. आपल्याकडील संसाधने वाचवावी लागतात. युद्धपरिस्थितीत नेत्यालाच चांगले निर्णय सुचतात, असे नाही,तर हाताखालील कनिष्ठ देखील निर्णयप्रक्रियेत मदत करतात. नेतृत्व करणे कोणत्याही क्षेत्रात सोपे नसते.शत्रूला बेसावध ठेवणे,चकित करणे महत्वाचे असते.वेळ साधणे महत्वाचे असते,असेही ते म्हणाले.
सैन्य दलाइतकी धर्मनिरपेक्ष व्यवस्था दुसरी कोणतीही नाही.आपण आपल्या सैन्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्यांच्या कामगिरी बदल प्रश्न उपस्थित करणे योग्य नसते.शाबासकीचा हात पुरेसा असतो,पारितोषिकांची गरज नसते,असे निंभोरकर यांनी नमूद केले.
भूदलाने सप्टेंबर २०१६मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे निंभोरकर हे मुख्य नियोजनकर्ता होते, तो हल्ला त्यांच्याच नेतृत्वात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या व्याख्यानात त्यांनी देशाच्या लष्कराने लढलेले युद्ध व त्याची फलनिष्पत्ती, देशाच्या शस्त्रसामग्रीची सज्जता व उत्पादन स्थिती, सर्जिकल स्ट्राइकनंतर बदललेली मानसिकता यावर त्यांनी भाष्य केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय सैन्य दलाविषयी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.निंभोरकर यांचा आयोजकानी सत्कार केला.
ओएचआर फाउंडेशन ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या दशकभरापासून, हे ज्ञानवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरले आहे, जे एचआर व्यावसायिक, कार्यकारी नेतृत्व आणि प्रतिष्ठित योगदानकर्त्यांना एकत्र आणते. २०१३ मध्ये स्थापनेपासून, ओएचआर फाउंडेशनने व्यावसायिक प्रगती आणि ज्ञानविनिमयाला प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवली आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम एचआर व्यावसायिक, प्रायोजक आणि कार्यकारी टीम सदस्यांच्या सातत्यपूर्ण योगदानातून साकार होत आहे. दोन हजाराहून अधिक सदस्य आहेत,अशी माहिती देण्यात आली.