ठुमरी सम्राज्ञी शोभा गुर्टू यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजन
पुणे : सुप्रसिद्ध गायिका आस्था शुक्ला यांनी उपशास्त्रीय संगीतातील वैशिष्ट्ये दर्शविणारी ठुमरी, होरी, गझल, दादरा, भजन ऐकवून रसिकांची मने जिंकली.
ठुमरी सम्राज्ञी शोभा गुर्टू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. गांधर्व महाविद्यालय, पुणे येथील विष्णू विनायक स्वरमंदिरात ही मैफल झाली.
आस्था शुक्ला यांनी मैफलीची सुरुवात वात्सल्याचे भावरंग दर्शविणाऱ्या ‘राधा नंदकुंवर समझात रही’ या मिश्र खमाज रागातील ठुमरीने केली. प्रामुख्याने कथक नृत्य प्रकारात उपशास्त्रिय संगीतातील होरी रचनेवर नृत्याविष्कार सादर केला जातो. शुक्ला यांनी बिंदादिन महाराज रचित मिश्रगारा रागावर आधारित ‘मै तो खेलूंगी उनहिसे’ ही होरी प्रभावीपणे सादर केली. उर्दू शब्दप्रधान गायकी दर्शविताना ‘साईल से खफा युँ मेरे प्यारे नही होते’ ही गझल सादर करून रसिकांना मोहित केले. या नंतर मिश्र देसमांड रागातील लोकसंगीतावर आधारित ‘सेजरिया कैसे आऊँ ढोला’ ही राजस्थानी ठुमरी ऐकविल्यानंतर ‘नजरिया लागे नही कही ओर’ हा दादरा सादर केला. यातून शोभा गुर्टूजींचे साहित्यविषयक विचार प्रकट होतात, असे शुक्ला यांनी आवर्जून सांगितले.
संत मीराबाई यांचा भक्तीसमर्पण भाव दर्शविणारे ‘तुम केहोल जोशी, शाम मिलन कब होसी’ हे भजन सादर करून नंतर मिश्र पहाडी रागातील ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे’ हा दादरा ऐकविला. शुक्ला यांनी मैफलीची सांगता संत कबीर यांची मुलगी संत कमाली यांनी रचलेल्या अध्यात्माची कास धरलेल्या ‘सैया निकस गए मै ना लडी थी’ या मिश्र भैरवी रागातील भावपूर्ण रचनेने केली. उपशास्त्रीय संगीतात तबला साथीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गीतांच्या अंगानुसार तबला वादनामध्ये दाया-बायाचे संतुलन साधत साथसंगत करावी लागते. पार्थ ताराबादकर यांनी वादनातील प्रगल्भतेचे दर्शन घडवित तबला साथ केली. शुभदा आठवले (संवादिनी), गायत्री गोखले, अनघा पाठक (सहगायन) यांनी साथसंगत केली.
प्रास्ताविकात प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी शोभा गुर्टू यांच्या आठवणींना उजाळा दिला. कलाकारांचा सत्कार उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी केला.