दीपक मानकर,रमेश बागवे, रुपाली पाटील अशा नेत्यांच्या साथीने रवींद्र धंगेकर यांनी गेल्या 2 वर्षापूर्वी कसबा काँग्रेस कडे खेचून आणला होता.तो भाजपने पुन्हा आता स्वतःकडे खेचण्यात यश मिळवले आहे.
- हेमंत रासने : ९० हजार ४६
- रवींद्र धंगेकर : ७० हजार ६२३
- गणेश भोकरे : ४ हजार ८९४
- कमल व्यवहारे : ५५२
दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत विरोध कौल देणाऱ्या कसब्याने यंदा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पसंती दिली. या मतदार संघात झालेल्या चौरंगी लढतीत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा १९ हजार ४२३ मतांनी पराभव केला.
त्यामुळे रासने यांच्या विजयाने बालेकिल्ला परत मिळविण्यात भाजपला यश आले आहे.
रासने आणि धंगेकर यांच्यासह माजी महापौर आणि कॉंग्रेसच्या बंडखोर कमल व्यवहारे आणि मनसेचे उमेदवार गणेश भोकरे रिंगणात होते. त्यामुळे चुरशीची लढत होणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पहिल्या फेरीपासून रासने यांनी मतांची आघाडी घेतली. अखेरच्या फेरीत १९ हजारांहून अधिक मताधिक्य घेत रासने यांचा विजय झाला.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत रासने विरुद्ध धंगेकर अशी लढत होती. त्यात महाविकास आघाडीचे धंगेकर यांनी विजयी मिळविला होता. मध्यंतरी युती आणि आघाडीतील मित्रपक्षात बदल झाले. महायुतीने पुन्हा एकदा रासने यांना, तर महाविकास आघाडीने धंगेकर यांना संधी दिली. धंगेकर यांच्या कामाचा झपाटा, तर पराभवानंतर घरी बसून न राहता रासने यांनी घेतलेली मेहनत, पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रतिष्ठेची केलेली निवडणूक यामुळे रासने यांचा सरळ विजय झाला. याउलट पक्षांतर्गत असलेली नाराजीआणि बंडखोरी थोपविण्यात कॉंग्रेसला अपयश आले. तसेच निवडणुकीतील शिलेदारांनी साथ सोडल्याने धंगेकर यांना पराभव पत्कारावा लागला. पोटनिवडणुकीत दगा दिलेल्या १५ नंबर प्रभागाने यंदा रासने यांना मोठे मताधिक्य दिले. त्याचबरोबर धंगेकर यांना मताधिक्य देणाऱ्या १७ आणि १८ नंबरच्या प्रभागात रोखण्यात भाजपला यश आले.