एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील–विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. निवडणूक निकालानंतर महायुतीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण हे ठरवतील. 75 टक्के सर्व्हे आमच्या बाजूने आहेत. आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढली. त्यामुळे शिंदेच हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे. यासंबंधी नितीश कुमार यांचे उदाहरण पाहता येईल. वरिष्ठ नेते यासंबंधी योग्य तो निर्णय घेतील. पण एकनाथ शिंदे ज्या भावनेने काम करतात ते जनतेला आवडले अशी सर्वसामान्यांची भावना आहे.एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही त्याला बांधिल आहोत. ते जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबुतीने राहू, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे .
संजय शिरसाट यांनी मंगळवारी सकाळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात पत्रकाराने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेनेच्या संभाव्य युतीविषयी प्रश्न केला. त्याला उत्तर देताना संजय शिरसाट यांनी यासंबंधीचा कोणताही निर्णय एकनाथ शिंदे हेच घेतील असे स्पष्ट केले. शरद पवार यांच्यासोबत जायचे की नाही? याचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतली. आम्हाला त्यावर भाष्य करता येणार नाही.
विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मतदान यंत्रामध्ये बंद झाल्यानंतर आता राज्यात कुणाची सत्ता येणार? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य युतीचे संकेत दिलेत. यामुळे निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.संजय शिरसाट यांनी तत्पूर्वी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना कथित व्होट जिहादवर भाष्य केले. विरोधी पक्षांचा व्होट जिहाद सुरू होता. याऊलट आम्ही धर्मयुद्ध लढत होतो. आमचे धर्मयुद्ध सक्सेस झाले. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है आदी घोषणा प्रचंड यशस्वी झाल्या. हिंदू बांधवांसह सर्वच जातीधर्माच्या लोकांनी महायुतीला पसंती दर्शवली. त्यामुळे या निवडणुकीत आमचाच विजय होईल हे निश्चित आहे. सरकारच्या योजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी या सर्व बाबी आमच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे मतांची वाढलेल्या टक्क्याचा कौल महायुतीच्याच बाजूने असेल आमचा दावा आहे, असे ते म्हणाले.