पुणे, दि. १८ नोव्हेंबर, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे, ठिकठीकाणी नागरिकांचा मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद, राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेची सकारात्मकता आणि महायुतीमधील तीनही प्रमुख नेत्यांनी राज्यातील जनतेचा संपादन केलेला विश्वास यांच्या जोरावर निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळेल असा विश्वास छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला. आज राज्यभरात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होत असताना आयोजित पत्रकार परिषदेत शिरोळे बोलत होते. मतदार संघाचे प्रचारप्रमुख दत्ता खाडे, भाजपा शहर अध्यक्ष गणेश बगाडे आणि शहर सरचिटणीस रवींद्र साळेगांवकर यावेळी उपस्थित होते.
प्रचारा दरम्यान जसे जसे दिवस संपत जात होते तसतसा मतदार संघातील नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेल्याचे पहायला मिळाले. त्यांच्या देहबोलीमधून त्यांची महायुतीला विजयी करून देण्याची धारण जाणवत होती. नागरिकांच्या या प्रतिसादाने मी भारावून गेलो असे सांगत सिद्धार्थ शिरोळे पुढे म्हणाले, “शिवाजीनगर मतदार संघात महायुतीसाठी पोषक वातावरण असून लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही ज्या उर्जेने काम करीत आहेत त्याचे प्रतिबिंब आम्ही स्थानिक पातळीवर पाहू शकतोय. या तिघांचाही संपर्क, दूरदृष्टी आणि प्रशासनावर असलेली पकड नागरिक पाहत आहेत. त्यांनी योग्य वेळी आणलेल्या योजना आणि त्या राबविण्याची केलेली व्यवस्था यामुळे महायुती सरकारचे वेगळेपण त्यांच्या कामातून जनतेला दिसत आहे. पुण्यातील आठही महायुतीच्या जागा निवडून येतीलच शिवाय राज्यातही आम्ही बहुमताचे सरकार स्थापन करू.”
मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात मी केलेली विकासकामे मतदार संघातील नागरिकांना माहिती आहेत. या काळात अनेक मोठे विकासात्मक प्रकल्प मार्गी लागले आहेत. मेट्रोची तीस पैकी दहा स्थानके ही शिवाजीनगर मतदारसंघात आहेत. याच जोडीला आता शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे कामदेखील विक्रमी वेळेत पूर्ण होताना दिसत आहे. या मेट्रो मार्गामुळे शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांना मेट्रोची आणखी तीस स्थानके उपलब्ध होणार आहेत. पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, येत्या जानेवारीत ते पूर्ण होईल. याबरोबरच जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. सोबतच खडकी व रेंज हिल्स येथील अंडर ब्रिजच्या विस्तारीकरणाचा विकास आराखडा तयार केला जात आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या एकत्रीकरणाचे काम सुरू असून त्यालाही लवकरच गती येईल, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.
माझ्या आमदार विकास निधीतील मोठा वाटा हा सेवा वस्त्यांसाठीच्या विकासकामांसाठी खर्च केला असून या भागात मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यावर मी यानंतरही भर देणार आहे. पुढील २ ते तीन वर्षांत शिवाजीनगर मतदार संघाचा कायापायाल करू असेही शिरोळे यांनी नमूद केले. मागील लोकसभा निवडणुकीत कमी टक्के मतदान झाल्याची आकडा आता नागरिक स्वत:च भरून काढतील. यावेळी मतदानाचा टक्का वाढून ५१ टक्के मते मला मिळतील असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे समाधान शिरोळे यांनी व्यक्त केले.