पुणे : ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे शनिवारी ‘त्रिवेणी’ या विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले असून यात सतार, सरोद आणि व्हायोलिन वादनातून रसिकांना भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, प्लॉट नं. 17, वेद भवन मागे, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘त्रिवेणी’ या विशेष सांगीतिक मैफलीची सुरुवात नेहा महाजन यांच्या सतार वादनाने होणार असून त्यांना अनिरुद्ध शंकर तबला साथ करणार आहेत. त्यानंतर अनुपम जोशी यांचे सरोद होणार असून त्यांना महेशराज साळुंखे तबला साथ करणार आहेत. ‘त्रिवेणी’ मैफलीचा समरोप पंडित मिलिंद रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होणार असून त्यांना पंडित विश्वनाथ शिरोडकर यांची तबलासाथ असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्च्या समन्वयक रश्मी वाठारे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कलाकारांविषयी…
नेहा महाजन यांचे सतार वादनातील प्राथमिक शिक्षण त्यांचे वडील आणि बीनकर घराण्याचे प्रवर्तक विदुर महाजन यांच्याकडे झाले. मैहर घराण्याची वादन परंपरा समजून घेत नेहा यांनी शास्वती साहा यांच्याकडून मार्गदर्शन घेतले असून सेनिया घराण्याच्या रवी गाडगीळ यांच्याकडूनही त्यांना वादनाचे धडे मिळाले आहेत. मैहर घराण्याचे सतार वादक उस्ताद जुनैद खान यांनी नेहा यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे.
अनुपम जोशी हे सरोद वादनाचे सखोल अभ्यासक असून युवा पिढीतील सरोद वादकांमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सुरुवातीस प्रसिद्ध सतार वादक पंडित सुधीर फडके यांच्याकडे त्यांनी सरोद वादनाचे धडे गिरवले तेथे त्यांना गुरूमा अन्नपूर्णादेवी यांच्या दुर्मिळ रचना समजून घेता आल्या. पंडित तेजेंद्र नारायण मजुमदार, पंडित राजीव तारानाथ तसेच उस्ताद अली अकबर खान यांचे ज्येष्ठ शिष्य झुकरमन यांचेही मार्गदर्शन अनुपम यांना लाभले. अनुपम जोशी यांनी अनुमोहिनी वीणा हे रुद्र वीणेच्या जवळ जाणारे वाद्य निर्मित केले असून याची मूळ संकल्पना राधिका मोहन मोईत्रा यांची आहे.
स्वरप्रज्ञा पंडित मिलिंद रायकर हे आजच्या पिढीतील प्रसिद्ध व्हायोलिन वादक आहेत. रायकर यांना पद्मश्री पंडित डी. के. दातार तसेच पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. यातूनच रायकर यांनी मधुर, सुरेल आणि भावपूर्ण अशी गायकी अंगाने व्हायोलिन वादनाची शैली विकसित केली. सुरुवातीस गोवा येथील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक प्रा. ए. पी. डिकोस्टा यांच्याकडून त्यांनी पाश्चात्य पद्धतीने व्हायोलिन वादनाचे धडे गिरविले. यानंतर वडिल अच्युत रायकर व पंडित बी. एस. मठ (धारवाड) आणि पंडित वसंतराव कडणेकर (गोवा) या तिघांच्याही सक्षम मार्गदर्शनाखाली रायकर यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या अंगाने व्हायोलिन वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे.