पुणे : हरियाणापेक्षा महाराष्ट्रात जास्त चांगले खेळाडू आहेत. परंतु, त्यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळत नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देशाचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंना कसल्याही सोयी-सुविधा हे सरकार देत नाही. खेळाडूंसाठी चांगली मैदानेही नाहीत. खेळाडूंच्या विकासासाठी खेळाच्या मैदानात आम्हा खेळाडूंना आशीर्वाद देता तसा महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतांमधून आशीर्वाद द्या, असे आवाहन हरियाणातील काँग्रेसच्या आमदार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सोमवारी केले.
महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रमेश बागवे, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर, पर्वती विधानसभा मतादरसंघातील उमेदवार अश्विनी कदम, हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दत्ता बहिरट, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत मोकाटे, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील बापू पठारे आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनेश फोगट यांच्या उपस्थितीत खेळाडू मेळाव्याचे काँग्रेस भवन येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विनेश फोगट यांना गदा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चवधरी, महिला काँग्रेसच्या प्रभारी शहराध्यक्ष संगीता तिवारी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय शिंदे, रफीक शेख, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद तसेच मेळाव्याचे आयोजक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, शहर काँग्रेसच्या क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे, उपाध्यक्ष लतेंद्र भिंगारे, ओम भवर आदी उपस्थित होते.
राजकारणात येईन, असे मला कधी वाटले नव्हते. मी आता राजकारणात असले तरी आधी खेळाडू आहे. आता राजकारणातील जबाबदारी वाढली आहे. मैदानावर संघर्ष केल्यानंतर महिलांच्या शोषणाविरोधात रस्त्यावर संघर्ष करावा लागला. क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना हा त्रास होऊ नये, यासाठी मी संघर्ष करायला तयार आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या तसेच चांगल्या वातावरणात त्यांना आपला खेळ वाढवता यावा यासाठी मी खेळाडूंबरोबर कायम मैदानात उभी असेन. चांगले शिक्षण आणि प्रशिक्षण दिले तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशात घडतील, अशी भावना फोगट यांनी व्यक्त केली. भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे दोन पक्ष फोडले. या महायुतीला धडा शिकवण्याती वेळ आली आहे. मतदानात मोठी ताकद असते. ही ताकद महायुतीला दाखविण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली.
उज्ज्वल भविष्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा,असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकार येताच प्रत्येक शहरात चांगली मैदाने बांधण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. विनेश फोगट यांच्याशी संवाद साधण्यासाठी खेळाडूंची या मेळाव्याला उपस्थिती होती. विविध पदक विजेत्या दिग्गज आणि ज्येष्ठ खेळाडूंपासून लहान मुलांची यावेळी गर्दी झाली होती.