मुंबईतील टोलमाफी एक लॉलीपॉप, एमएमआर भागातील रस्त्यांवर ३५ वर्षांसाठी टोल वसुलीचे दिले कंत्राट.
मुंबई, दि. १७ नोव्हेंबर २०२४
भाजपा शिंदे सरकारच्या काळात मुंबई व महाराष्ट्रात गुंडगिरी वाढली असून कुख्यात गुन्हेगार खुलेआमपणे फिरत आहेत. लॉरेन्स बिन्शोई साबरमतीच्या जेलमधून बॉलिवूडला धमक्या देत आहे. फेसबुक लाईव्हवर हत्या, पोलीस स्टेशनमध्ये खुलेआमपणे गोळीबार, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या अशा गंभीर घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर कुख्यात गुंडांचा वावर व मंत्रालयात गुंड रिल बनवत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा कुख्यात गुंड गजा मारणेला भेटतो हे राजकीय नेते व गुंडांच्या भ्रष्ट युतीमुळेच शक्य झाले आहे. महायुती सरकारच्या काळात राजकीय आशिर्वादने गुंडगिरी फोफावून महाराष्ट्रात बंदूक संस्कृती व गुंडाराज निर्माण झाले आहे असा तुफान हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे.
टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले की, महायुती सरकारच्या बी कंपनीने राज्यातील टेंडर व कंत्राट वाटपात मोठा भ्रष्टाचार केला आहे. या बी कंपनीने महाराष्ट्रातील औद्योगीक प्रगतीला खिळ घातली असून महाराष्ट्रातील उद्योग धंदे, गंतुवणूक, नोकऱ्या दुसऱ्या राज्यात पाठवल्या आहेत. तसेच महायुतीच्या काळात महागाई प्रचंड वाढवून जनतेचे जगणे नरक बनवले आहे. या बी कंपनीने मुंबई गहाण ठेवली असून २०२० मध्ये जीव्हीके कंपनीकडून ईडी सीबीआयची कारवाई करून मुंबई विमानतळ अदानींच्या घशात घातला. आता धारावीची जमीन अदानीच्या घशात घातली जात आहे, धरावीच्या ४२९ एकर जमिनीच्या बदल्यात अदानीला मुंबईतील कुर्ला डेअरी, म़ड आयलंड, मुलुंड, कांजुर मार्ग, देवनार डंपिंग ग्राऊंड, मिठागरांची अशी मिळून तब्बल ९९० एकर जमीन बहाल केली आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली अदानीला ७८६ लाख चौरस फूट जमीन दिली आहे. मुंबईवर अदानीचे राज्य बनवले आहे यामुळे मुंबईतील कोणत्याही बिल्डरला अदानीकडूनच ४० टक्के टीडीआर घ्यावा लागणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच नाक्यांवरील पथकर लहान वाहनांसाठी बंद केल्याची घोषणा केली आहे, ही घोषणा एक लॉलीपॉप असून टोलमाफ करत असतानाच एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडी भागातील रस्त्यांवर ३५ वर्ष टोल वसुलीचे कंत्राट दिले आहे. जयंत म्हैसकर यांची कंपनीकडे मुंबईच्या पाच टोल नाक्याचे कंत्राट होते. ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. या टोलमाफीतून म्हैसरकर यांच्या कंपनीला फायदा पोहचवण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे ठाणे बोरिवली बोगद्याचे काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीला दिले आहे, ज्या कंपनीने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाला ९९० कोटींची देणगी दिली होती. शिंदे भाजपा सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राला सर्व बाजूनी लुटले आहे.
महायुतीच्या काळात महागाई गगणाला भिडली आहे. जिवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहेत, भाजीपाला, कांदा लसूणही आवाक्याबाहेर गेला असून शाळेची भरमसाठी फी वाढली आहे. शिंदे भाजपा सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करुन ठेवले आहे. सर्वसामन्यांवर जीएसटीचा ओझे टाकून जनतेला लुटले जात आहेत या महागाईमुळे प्रत्येक कुटुंबावर १ लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे, अशा सरकारला आता घरी बसवा असे आवाहन सुरजेवाला यांनी केले.