एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा – निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजन
पुणे : हमराज मृत्युंजय आणि अदिश्री इंटरप्राइजेस यांच्यात निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा टेनिस प्रीमियर एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे.
वडगाव बुद्रुक येथील सिंहगड रोडवरील मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या उपांत्य लढतीत प्रशांत शुक्लाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अदिश्री संघाने अलोक इलेव्हन संघावर ३८ धावांनी मात केली. अदिश्री संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ५ बाद १०० धावांपर्यंत मजल मारली. प्रशांतने सहा चेंडूंत तीन षटकारांसह १९ धावा फटकारल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना अलोक इलेव्हनचा डाव ७.२ षटकांत ६२ धावांत संपुष्टात आला. प्रशांतने दोन षटकांत केवळ नऊ धावा देऊन चौघांना बाद केले.
यानंतर दुसऱ्या उपांत्य लढतीत अनिकेत ताकवणेच्या फटकेबाजीच्या जोरावर हमराज मृत्युंजय संघाने बारामती ब्लास्टर्स संघाचे आव्हान सात गडी राखून परतवून लावले. बारामती संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ९ बाद ७५ धावा केल्या. यानंतर हमराज संघाने विजयी लक्ष्य तीन गडींच्या मोबदल्यात ७.१ षटकांतच पूर्ण केले. अनिकेतने १२ चेंडूंत नाबाद ३३ धावांची खेळी केली. यात त्याने चार षटकार व एक चौकार लगावला.
धावफलक : उपांत्य फेरी – अदिश्री इलेव्हन – ८ षटकांत ५ बाद १०० (आदित्य जाधव ३६, आकाश काळे नाबाद २६, प्रशांत शुक्ला १९, दत्ता पवार १४, अभिषेक कुजुर २-३३, क्षितिज दिवेकर १-१९ ) वि. वि. अलोक इलेव्हन – ७.२ षटकांत सर्वबाद ६२ (राजू पाटे २३, निखिल चव्हाण १३, प्रशांत शुक्ला ४-९, राजू पेरुमल १-६, उमेश नायडू १-३).
बारामती ब्लास्टर्स – ८ षटकांत ९ बाद ७५ (अक्षय तावरे २५, संतोष लष्कर १४, राजेश सोरटे १२, ओंकार साळुंके ३-२१, वसीक शेख २-७, महेश नानगुडे १-६) पराभूत वि. हमराज मृत्यूंजय – ७.१ षटकांत ३ बाद ७९ (अनिकेत ताकवणे नाबाद ३३, किसन मरगळे नाबाद १३, वसीक शेख १३, महेश नानगुडे ११, ).