बारामतीच्या मोठ्या घरात सुरु झाली सासू सुनेची टीव्ही सीरिअल ?
शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या त्यांची नात रेवती सुळे हिच्यासोबत बारामतीतील टेक्सटाईल पार्क येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यांची गाडी गेटवर आल्यानंतर वॉचमनने त्यांना आत सोडले नाही. या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याची माहिती आहे. प्रतिभा पवार आणि त्यांच्या नातीला अर्धा तास गेटवरच ताटकळत ठेवले. त्यानंतर आत सोडण्यात आले. बारामतीत दडपशाहीची हद्द ओलांडली आहे, अशी टीका महाविकास आघाडीने केली आहे.
प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना अडवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रतिभा पवार या नात रेवती सुळेंसह शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये आल्या होत्या. गेटवर आल्यानंतर त्यांची गाडी अडवण्यात आली, त्याचबरोबर गेट पुढे केले, असा दावा व्हिडीओमध्ये केला जात आहे. तर गेटवरील सुरक्षारक्षकाला याबाबत प्रश्न विचारले असता, आम्हाला वरुन आदेश आलेत, फोन आला, त्यामुळे गेट लावले, असे गेटवर तैनात सुरक्षा रक्षकाने सांगितल्याचे दिसून येत आहे.तुम्ही आम्हाला पाहून गेट बंद केले का? तुम्हाला गेट बंद करण्यासाठी कोणी सांगितले. तुम्हाला कोणाचा फोन आला? आतमधील दुकाने बंद आहेत का? आमची गाडी आल्यावर गेट बंद केले का? असे प्रश्न प्रतिभा पवार यांनी सुरक्षा रक्षकाला विचारले. आम्ही चोरी करण्यासाठी आलेलो नाही, आम्हाला शॉपिंग करायची आहे. आम्हाला त्या बॅगच्या शॉपमध्ये जायचे आहे, असेही प्रतिभा पाटील व्हिडिओमध्ये बोलल्याचे दिसत आहेदरम्यान, या सर्व प्रकारावरून महाविकास आघाडीने अजित पवारांवर टीका केली आहे. आज बारामतीत दडपशाहीची हद्द ओलांडली, असे मविआने म्हटले आहे. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची पत्नी प्रतिभकाकी पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले व आतमध्ये सोडले नाही. ह्या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत सौ. सुनेत्रा पवार. ज्यांनी तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवले त्यांचा रस्ता तुम्ही आज अडवला आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या एक्स वर पोस्ट करण्यात आली आहे.