मुंबई-ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका, महाराष्ट्र दुश्मन फडणवीसांची पालखी वाहू नका, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला आहे. आम्हाला ईडीने अटक केली होती, पण आम्ही XX सारखे वागलो नाही, तुम्हाला ईडीने एकदा बोलावले, तर तुम्ही दोन वर्ष कोमात गेला आणि आता भाजपची सुपारी घेत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
ठाकरे गटाचे विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील राऊत यांचा प्रचारार्थ संजय राऊत यांची सभा झाली. यावेळी संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून राज ठाकरे हे सुनील राऊत यांच्याविरोधात सभा घेत आहेत. राज ठाकरे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नरेंद्र मोदी, अमित शाहांचे बूट चाटत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. राज ठाकरे, नरेंद्र मोदी आणि अमित शहांना स्वप्नात मीच दिसतो. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना माझ्या नावाने झोप लागत नाही, ही निष्ठावंतांची ताकद आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली. मग आता आपल्या सभेत त्यांच्यासाठी खाट ठेऊया. कारण 23 तारखेला आपण त्यांची खाट टाकणारच आहोत. आम्ही बाळासाहेबांची कडवट निष्ठावंत आहे. आम्ही आमची निष्ठा आणि इमान विकले नाही. आम्हीला ईडी घेऊन गेली म्हणून घाबरलो नाही. तुम्हाला ईडीने एकदा बोलवले, तर दोन वर्ष कोमात गेलात, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.
बाळासाहेब ठाकरे यांनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणताय, हे तुमचे बाळासाहेबांवरचे प्रेम आहे का?.
येथे एक भिकारडा संपादक राहतो, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र भिकारी केला आहे. त्या मोदींचे आपण पाय चाटत आहात. बाळासाहेब ठाकरे यांनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणताय, हे तुमचे बाळासाहेबांवरचे प्रेम आहे का?. तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. महाराष्ट्राच्या दुश्मनांचे बुट चाटू नका, अशी माझी नम्र विनंती आहे.