पुणे : काँग्रेसने नेहमी व्यापाऱ्यांचा सन्मान केला आहे. काँग्रेसने व्यापाऱ्याचे विकेंद्रीकरण केले. मात्र भाजप सरकारने व्यापाऱ्याचे केंद्रीकरण केले आहे. भाजपने व्यापाऱ्यांना आर्थिक आंतकवादाच्या स्थितीत आणले आहे. व्यापाऱ्यांना घाबरवले जात आहे. देशातील छोटे व्यापारी सुरक्षित नाहीत. जीएसटीमुळे व्यापारी भरडला जात आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन यांनी केली. भाजपच्या काळात पुण्याची दुर्दशा झाली आहे. भाजपचे आमदार व्यापाऱ्यांना धमकावतात, अशीही टीका त्यांनी केली.
महाविकास आघाडीचे पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रमेश बागवे, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सरदार भोलासिंग अरोरा, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ग्राहक संरक्षक सेलचे अध्यक्ष अरुण कटारिया आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची व्यापारी आघाडी यांच्यातर्फे गुलटेकडी येथील महावीर प्रतिष्ठानमधील पारख सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्तराखंडचे विरोधी पक्षनेते टी. एस. सिंगदेव, ज्येष्ठ व्यापारी देवीचंद भन्साळी, विजयकांत कोठारी, वालचंद संचेती, डॉ. जितेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व सचिन सावंत, गौरव जैन आणि नितीन कदम उपस्थित होते.
काँग्रेसने जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा दिला. माजी मंत्री प्रतीक पाटील आणि अभय छाजेड यांनी यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. जैन समाज संख्येमुळे नाही, तर गुणवत्तेमुळे ओळखला जातो. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी व्यापाराचे विकेंद्रीकरणाचे केले. देशात छोटे-छोटे उद्योग विकसित व्हावेत, यासाठी त्यांनी व्यापारपूरक धोरण अवलंबले, असे जैन यांनी सांगितले. भाजपने व्यापाराचे केंद्रीकरण केले आहे. चुकीच्या जीएसटी धोरणामुळे व्यापारी भरडला जात असून, काही व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी टीका त्यांनी केली.
सिंगदेव म्हणाले, व्यापाऱ्यांनी व्यवसाय वाढवून समाजासाठी काम केले पाहिजे. त्यासाठी सरकारने व्यवसायपूरक धोरण राबविले पाहिजे. सरकारकडे करातून पैसा येणार नाही तोपर्यंत सरकार विकास धोरण राबवू शकत नाही. मात्र कररचना संतुलित पाहिजे. जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आला आहे. केंद्र सरकारच्या जीएसटी कौन्सिलमध्ये मी उत्तराखंड सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. दिवंगत अरुण जेटली अध्यक्ष असताना वातावरण वेगळे होते. सर्वानुमते निर्णय घेतले जात होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अध्यक्ष झाल्यापासून बिगरभाजप सरकारच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. व्यापारपूरक धोरणांसाठी जीएसटी कौन्सिलमध्ये चांगला प्रतिनिधी पाठविण्याची गरज आहे. त्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या.
लोंढे म्हणाले, जैन समाजाची लोकसंख्या कमी आहे; पण हा समाज देशाला मोठा कर देऊन देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत आहे. देशाच्या प्रगतीमध्ये व्यापाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. चुकीच्या जीएसटी रचनेमुळे व्यापारी अडचणीत आहेत.
एलबीटी असता तर आज ही परिस्थिती नसती. भाजपने एलबीटीवरून व्यापाऱ्यांना भडकवले. जीएसटीमुळे महापालिकांकडे आज पैसा नाही. १९ प्रकारचे कर संपून जीएसटी लागू होणार होता. क्रयशक्ती वाढली नाही, मागणी वाढली नाही, तरी कर वाढला आहे. काँग्रेस सरकार असते तर कर दहशतवाद दिसला नसता. जीएसटीची योग्य अंमलबजावणी केली असती. काँग्रेस दोन नाही, तर सर्व व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भगवान महावीरांनी अहिंसेची शिकवण दिली. भाजपच्या काळात सगळीकडे हिंसा वाढली आहे.
सावंत म्हणाले, महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. व्यापारपूरक धोरणांसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या.
सत्ताधारी गुंडांचा मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना त्रास
व्यापारी हा काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे. शरद पवारांनी व्यापाऱ्यांना कायम मदत केली आहे. पर्वती मतदारसंघातील सत्ताधारी गुंडांचा मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना त्रास होतो. व्यापाऱ्यांना तक्रारही करता येत नाही, अशी टीका अंकुश काकडे यांनी केली. महाविकास आघाडी व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून, महाविकास आघाडीची सत्ता आल्यास सर्व अडचणी सोडविण्यात येतील, असे आश्वासन काकडे यांनी दिले.