भाजपा सरकारचा घोटाळ्यांचा विक्रम, कामगारांसाठीच्या भांड्याचे सेट दुप्पट किमतीला खरेदी करून २२५ कोटींचा घोटाळा.
मुंबई, दि. १७ नोव्हेंबर २०२४
नागपुरमध्ये होणाऱ्या टाटा एअरबस प्रकल्पाचे गुजरातच्या बडोद्यात उद्घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मोदी सरकारने हिरे उद्योग, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रासह, वेदांता फॉक्सकॉन सारखे १७ मोठे प्रकल्प गुजरातला पळवले. राजकीय लाभासाठी भाजपा महाराष्ट्रातील उद्योग, वित्तीय संस्था गुजरातला पळवून महाराष्ट्राशी भेदभाव केला आहे. या भेदभावामागे एक मोठे षडयंत्र असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून गुजरातकडे घेऊन जाण्याचा डाव आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागिनी नायक यांनी केला आहे.
टिळक भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रागिनी नायक म्हणाल्या की. महाराष्ट्रातील भाजपा सरकारने मागील १० वर्षात ५ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रावर २.९ लाख कोटींचे कर्ज होते ते वाढून आता ७.८२ लाख कोटी झाले आहे. कर्जाचा डोंगर वाढवून भाजपा सरकारने स्वतःचे खिसे भरले व सरकाराची तिजोरी रिकामी केली आहे. भाजपा सरकारच्या भ्रष्टाचाराचे एक एक कारनामे पुढे आले आहेत. नागपूर व संभाजीनगरच्या इमारत बांधकाम कामगारांना ३० भांड्यांचा एक सेट भेट देण्याचा निर्णय झाला. यासाठी २७ ऑक्टोबर २०२० ला एक बैठक घेऊन टेंडर मागवण्यात आले. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने २०२१ साली याला मंजूरी दिली. स्टेनलेस स्टीलचे पाच लाख सेट वाटण्याचे निश्चित केले आणि पण हे काम स्टेनलेस स्टिल कंपनीला दिले नाही तर कापड उद्योगातील अग्रेसर मफतलाल कंपनीला देण्यात आले. ३० भांड्यांच्या एका सेटची किंमत ८८२० निश्चित केली गेली, म्हणजे ४४१ कोटींचे हे टेंडर निघाले. हाच दर बाजारात ५२५० रुपये होता आणि मोठ्या प्रमाणात खरेदी असल्याने त्याचा भाव कमी करून तो ४५०० रुपयांना मिळू शकला असता पण त्याकडे दुर्लक्ष करून तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपयांची लूट केली गेली. ही भांडी लाभार्थ्यांपर्यंत पोहचली की नाही हेही स्पष्ट झालेले नाही. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील भाजपा सरकारने जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून खिसे भरण्याचे काम केले आहे, असे रागिनी नायक यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, चरणसिंह सप्रा, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते उपस्थित होते.