हडपसरला कचरामुक्त, ट्रॅफिकमुक्त करण्याचे आश्वासन
पुणे: “सध्या राज्यात व केंद्रात विखारी, विभाजनवादी, जाती-धर्मात विष पेरणारे सरकार आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणाऱ्या या सरकारला हद्दपार करून भगवान गौतम बुद्धांचा अहिंसेचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा व बंधुतेचा विचार गरजेचा असल्याचे दाखवून द्यावे लागेल. त्यासाठी आंबेडकरी विचारांच्या जनतेने सर्वसमावेशक, सर्व जातीधर्माना सोबत घेऊन चालणाऱ्या महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे,” असे आवाहन हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी केले.मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सुरुवातीपासून प्रचारात आघाडीवर असलेल्या प्रशांत जगताप यांनी भेटीगाठींचा धडाका लावलेला आहे. मतदारसंघाचा एकही कोपरा जगताप यांनी सोडलेला नाही. प्रत्येक भागात जाऊन तिथल्या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन जगताप करीत आहेत. सोमवारी सिद्धार्थ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिद्धार्थ बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. संतोषनगर येथील श्वेता कॉम्प्लेक्स, मल्हार रेसिडेन्सी, आगम अपार्टमेंट, महावीर, कुंजीर सोसायटी, सक्सेस हाईट्समधील नागरिकांसोबत जगताप यांनी संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने सर्व नागरिकांचे प्रश्न जाणून घेत या भागाचा प्रतिनिधी म्हणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर राहील, असा शब्द जगताप यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस राहुल नामदेवराव होले यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तेथे त्यांचे होले परिवाराने औक्षण केले. माय माऊलींचा आशिर्वाद आणि पदयात्रेदरम्यान मिळणारा नागरिकांचा उत्साह नक्कीच उर्जा देणारा असल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली. माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक सुनिल बनकर यांच्या निवासस्थानी जगताप यांचे आपुलकीने स्वागत झाले. बहिणीने केलेल्या औक्षणाने जगताप भारावून गेले. त्यानंतर जगताप यांचे काळे बोराटे येथील किरण गाडेकर व सहकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. कामगार संघटनेचा पाठींबा कामगारांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते नामदेव घोरपडे यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेत असल्याचे नमूद केले. कामगार, सामाजिक चळवळीतील लोक पाठीशी असल्याने विजयाचा मार्ग अधिक सुकर होत चालल्याचा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.