विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे वातावरण तापले असताना आता अधिकाऱ्यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात ते बॅगांची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझ्यासारख्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगा तपासण्याचेही आव्हान दिले.
उद्धव ठाकरे यांची सोमवारी दुपारी वणी विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा झाली. तत्पूर्वी, त्यांचे हेलिकॉप्टर येथील हेलिपॅडवर लँड होताच अधिकारी त्यांच्या बॅगा तपासण्यास सरसावले. यावेळी उद्धव ठाकरे काहीसे संतप्त झाले. पण त्यांनी फार संयमाने परिस्थिती हाताळली. त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ स्वतः चित्रित करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महायुतीच्या सर्वच नेत्यांच्या बॅगा तपासण्याचे आव्हान दिले.
-दुसरीकडे, या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रचारसभेत या घटनेवरून मोदी – शहांसह राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, मी येथे प्रचाराला आल्यानंतर 7-8 अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली. मी त्यांना त्याची परवानगी दिली. मी त्यांचा व्हिडिओ काढला. पण यापुढे कुणाची बॅग तपासण्यात आली, तर प्रथम त्या अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासा, तो कुठल्या हुद्द्यावर आहे हे जाणून घ्या. जसे ते तुमचे खिसे तपासत आहेत, तसेच त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे. जिथे कुठे नाकानाक्यावर अडवतील तिथे – तिथे तपास अधिकाऱ्यांचे खिसे तपासा.
माझ्या बॅगा तपासल्याबद्दल मी अधिकाऱ्यांवर रागावलो नाही. पण त्यांनी जशी माझी बॅग तपासली, तशी मोदी – शहांचीही बॅग तपासण्याचे धाडस दाखवावे. त्यांचीच नव्हे तर दाढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेटवाल्यासह टरबुजाचीही (फडणवीस) बॅग तपासण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान मोदी हवाईदलाचे विमान वापरत आहेत. हा एक प्रकारचा गुन्हा आहे. त्यांच्या दौऱ्यावेळी रस्ते बंद केली जातात. दुकानेही बंद करण्यास सांगितले जाते. वाहतूक अडवली जाते. त्यानंतर हे सुसाट वेगाने जातात. पण मोदी असो की शहा, मिंधे असो की अजित पवार अथवा फडणवीस या सर्वांच्या बॅगा तपासा. अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या नाही तर त्या तपासण्याचे काम आमचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करतील. त्यावेळी मात्र पोलिस व निवडणूक आयोगाने मध्ये यायचे नाही. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे, तसा इतरांच्याही त्यांच्या बॅगा तपासण्याचा अधिकार आहे.
लोकसभा निवडणुकीत मिंधेंच्या हेलिकॉप्टरमधून बॅगाच्या बॅगा जात होत्या. तेव्हा या बॅगा कपड्यांच्या असल्याचे सांगण्यात आले होते. पण उन्हाळ्याच्या दिवसांत एवढे कपडे कोण घालते का? यापुढे शिवसेनाच नव्हे तर आमच्या आघाडीचे सर्वच कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील. होऊन जाऊ द्या. तुम्ही आमच्या तपासा, आम्ही तुमच्या तपासतो. मोकळ्या वातावरणात निवडणूक होऊ द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.