पुणे:प्रचारात आघाडी घेतल्यानंतर वडगाव शेरी मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा पाठिंबा वाढत आहे.काही जण उघडपणे तर अनेक कार्यकर्ते जाहीर न करता समर्थन देत आहेत.आज,सोमवार दि.११ नोव्हेंबर रोजी विश्रांतवाडीच्या माजी नगरसेविका सुनिता अनिल साळुंखे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. साळुंखे यांनी बापूसाहेब पठारे यांच्या प्रामाणिकपणा, समाजसेवा, आणि परिसरातील विकास कामे या गोष्टींवर विश्वास ठेवून हा पाठिंबा दिला आहे.माजी नगरसेविका सुनिता अनिल साळुंखे यांचे पती अनिल साळुंखे आणि असंख्य कार्यकर्त्यांनी देखील पाठिंबा व्यक्त केला आहे. येरवडा येथील माजी नगरसेवक हनीफ शेख, फरझाना शेख, आयुब शेख यांनीही पाठींबा दिल्याने बापूसाहेब पठारे यांच्या प्रचार यात्रांचा जोर वाढतो आहे.
‘आमदार असतानाच्या काळात बापूसाहेब पठारे यांनी आमच्या परिसरातील विकासकामे केली होती.सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून लक्ष घातले होते.एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर विश्वास असल्यानेच आम्ही पाठिंबा देत आहोत’,असे सुनिता अनिल साळुंखे यांनी सांगितले.या पाठिंब्याबरोबरच इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारीही बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाला समर्थन देण्यासाठी इच्छुक आहेत. विविध पक्षांतील प्रमुख कार्यकर्ते, समाजसेवक, आणि स्थानिक प्रतिनिधी हे बापूसाहेब पठारे यांच्या उमेदवारीला पाठीशी उभे राहण्यास तयार आहेत. यामुळे महाविकास आघाडीची स्थिती अधिक बळकट होणार असून आगामी निवडणुकीत विजय निश्चित करण्यासाठी एकात्मतेने काम केले जाईल.
बापूसाहेब पठारे यांनी या सर्व पाठिंब्याबद्दल आभार मानले असून सांगितले की, “विकासकामांच्या खात्री मुळे मला मतदार संघात पाठिंबा वाढत आहे.वाढत्या पाठिंब्यामुळे माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, आणि मी माझ्या कार्यक्षेत्राच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेईन.”
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या समर्थनामुळे अधिक सक्रिय झाले असून, विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांना विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.