भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि संगीत सत्र आसाम यांच्या वतीने ‘संगीत स्तुती’ कार्यक्रम
पुणे : आसामचे पारंपरिक तालवाद्य खोल आणि पखवाजची बहारदार जुगलबंदी… भरतनाट्यम आणि कथकचे डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्य…सत्रीय नृत्याचे मनमोहक सादरीकरण आणि कथक-सत्रीय नृत्याची जुगलबंदी… बासरीचे मंद स्वर… पारंपरिक आसामी गीते अशा संगीत, नृत्य आणि सूर यांच्या मिलापाने आसामी संस्कृतीचे विश्व पुणेकरांसमोर उलगडले. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि संगीत सत्र आसाम यांच्यावतीने ‘संगीत स्तुती’ या कार्यक्रमाचे आयोजन एरंडवण्यातील कर्नाटक हायस्कूलच्या श्रीमती शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियम येथे करण्यात आले होते. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, पंडिता मनीषा साठे, विद्यापीठाचे कुलसचिव जयकुमार, संगीत सत्र संस्थेचे संयुक्त सचिव पार्थ प्रतिम बोराह आणि अध्यक्ष स्वप्निल बरुआही, संगीत सत्राच्या सचिव गुरु रंजनमोनी सैकिया,अध्यक्ष राजीब बोरकटाकी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये नृत्य आणि संगीत विषयातील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे पुणे आणि आसाम मधील विद्यार्थी यांनी सादर केलेल्या नृत्य, संगीत आणि सुरांच्या सादरीकरणामुळे रसिकांना आसामी संस्कृतीची वेगळीच ओळख पाहायला मिळाली.
आसाम मधील विद्यार्थिनी अन्वेषा फुकण हिने राग भारती मध्ये एकतालात आसामी गाणे सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पखवाज आणि आसामी संस्कृतीमधील खोल या वाद्याची जुगलबंदीचा रसिकांनी आनंद घेतला. यामध्ये स्वप्निल सूर्यवंशी यांनी पखवाज तर आसाम मधील कलाकार अर्णव ज्योती भास्कर यांनी रसिकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले. आसाम मधील विद्यार्थी आणि गुरू यांनी पारंपरिक गायन – बयान प्रस्तुत करून आसाम मधील जुनी परंपरा दाखवली. प्रसिद्ध गीत रामायण काव्या वरती डॉ देविका बोरठाकूर आणि विद्यार्थ्यांनी सात्रिय नृत्य प्रस्तुत करून रसिकांची मने जिंकली.
अरुंधती पटवर्धन यांचे भरतनाट्यम तर शर्वरी जमेनीस यांच्या कथक नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच उंची लाभली. नृत्य,नाट्य संगीत आणि ताल यांच्या मिलापामुळे रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.