‘वंदे मातरम् 150’ अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रमाने पुण्यात शुक्रवारी शुभारंभ
पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’ या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150वे वर्ष दि. 7 नोव्हेंबर पासून सुरू होत असल्याने भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून वंदे मातरम् सार्ध शती समारोह समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांचा शुभारंभ शुक्रवारी पुण्यात ‘वंदे मातरम् 150’ या अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रमाद्वारे होणार आहे, अशी माहिती कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष, वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस, अरुणचंद्र पाठक, कार्यवाह संजय भंडारे, कार्याध्यक्ष शिरीष पटवर्धन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जन्मदा प्रतिष्ठान निर्मित, मल्हार प्रॉडक्शन प्रकाशित ‘वंदे मातरम् 150’ हा अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रम शुक्रवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन वंदे मातरम्चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांचे असून कार्यक्रमाचे दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी यांचे आहे. ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीचा इतिहास आणि 150 वर्षातील ‘वंदे मातरम्’ संदर्भातील ठळक नोंदी दृकश्राव्य माध्यमातून पाहता येणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या सहकार्याने दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता एक पाऊल देशासाठी-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथून वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे. शुभारंभ लॉन्स ते राजाराम पूल असा वॉकेथॉनचा मार्ग आहे. यात सर्व गटातील स्त्री-पुरुषांना सहभागी होता येणार आहे.
दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारी (दि. 11) शाळा सुरू होत आहेत. या दिवशी अनेक शाळांमध्ये सुरू होते वेळीस सामूहिकरित्या ‘वंदे मातरम्’चे गायन होणार आहे.
‘वंदे मातरम्’ या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150वे वर्ष सुरू होत असल्याचे निमित्त साधून भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून वंदेमातरम् सार्ध शती समारोह समितीतर्फे प्रत्येक राज्यात विविध कार्यक्रमांची आखणी केली जात आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, समूहगान स्पर्धांचे आयोजन, अनुबोधपटाची निर्मिती, आनंदमठ संगीत नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. वंदे मातरम्वर आधारित विषयांवर वक्तृत्व, कथाकथन, निबंध, काव्य, चित्रकला, प्रश्नमंजुषा, रिल्स मेकिंग, पथनाट्य अशा विविध प्रकारच्या स्पर्धा व कार्यक्रमांच्या माध्यमातून वंदे मातरम् घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न समिती करणार आहे. संपूर्ण देशभरात असे कार्यक्रम व्हावेत यासाठी देशभरातील विविध संस्था, संघटनांची मदत घेतली जाणार आहे.
‘वंदे मातरम्’विषयी ठळक नोंदी असलेली विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेली मराठी भाषेतील चित्रपुस्तिका नॅशलन बुक ट्रस्टतर्फे नुकतीच प्रकाशित करण्यात आली असून भविष्यात विविध भाषांमध्येही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. समग्र वंदे मातरम्चे दोन खंड या पूर्वी प्रकाशित करण्यात आले होते. त्यात माहितीची भर घालून 850 पानांचा एक ग्रंथ नव्या स्वरूपात स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासनातर्फे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
‘वंदे मातरम्’ची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्याचा वंदे मातरम् सार्ध शती समारोह समितीचा प्रयत्न आहे. याच उपक्रमातील एक पाऊल म्हणजे सोसायटी ऑफ इंडियन ॲकॅडमिक्स इन अमेरिका या संस्थेने ह्यूस्टन (अमेरिका) येथे दि. 16 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या इंडियन ॲकॅडमिक्स इश्यूज अँड इंडियन नॉलेज सिस्टिम या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत वंदेमातरम्चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले असून त्यांचे वंदे मातरम् : हिस्ट्री अँड इन्स्पिरेशन या विषयावर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे.