काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून संध्याकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.
दर तासाला महिला अत्याचाराच्या ५ तक्रारींची नोंद –राज्यातील ६४ हजार मुली, महिला बेपत्ता -आरोग्य विभागात तब्बल २० हजार पदे रिक्त -रुग्णवाहिकांच्या खरेदीत ८ हजार कोटींचा घोटाळा-
मुंबई, दि. ३० ऑक्टोबर २०२४-महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपायुतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड गोंधळ आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या जागांवरही भाजपानेच उमेदवार दिले असून या दोन्ही पक्षांना संपवण्याची भाजपाची ही सुरुवात आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महायुतीचे सरकार भ्रष्ट आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून सरकारने दोन वर्ष महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेले, जाता जाता युती सरकारने भरमसाठ निर्णय जाहीर केले पण त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडकी बहीण योजना बंद पडली आहे. भ्रष्टाचारी भाजपा युती सरकारला घालवण्याचा निर्धार जनतेने केला आहे. आता भाजपायुतीचे भ्रष्ट सरकार जाऊन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारने दोन वर्षांचे प्रगती पुस्तक जाहीर केले पण या सरकारने महाराष्ट्राची प्रगती केलेली नाही तर केवळ युती सरकारमधील धोकेबाजांची प्रगती झालेली आहे आणि महाराष्ट्राची दुर्गती केली आहे. भाजपा युती सरकारच्या काळात महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे, दोन वर्षात महिला अत्याचारांच्या ६७ हजार ३८१ प्रकरणांची नोंद झालेली आहे, दर तासाला महिला अत्याचाराच्या ५ तक्रारींची नोंद झालेली आहे. राज्यातील ६४ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा नागपुरातून १३ हजार मुली महिला बेपत्ता आहेत. महिलांप्रमाणे शेतकरीही दर्लक्षित राहिला, या सरकारच्या काळात २० हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत ही चिंतेची बाब आहे. एक रुपयात विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी नसून विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. भाजपा युती सरकारच्या काळात विमा कंपन्यांना ४ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. आरोग्य विभागात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून रुग्णवाहिकांच्या खरेदीत ८ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. आरोग्य विभागात तब्बल २० हजार पदे रिक्त आहेत. शिक्षण क्षेत्रातही अनागोंदी कारभार असून ४४ लाख मुलांना अजून गणवेशही मिळालेले नाहीत. राज्यातील जिल्हा परिषदेच्या १४ हजार शाळा बंद करुन गरिब व मध्यमवर्गियांना शिक्षणापासून वंचित करण्याचे काम सुरु झाले आहे. दत्तक शाळा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा अदानीला देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस कितीही दावा करत असले तरी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग प्रकल्पही गुजरातने पळवला. महाराष्ट्रातील ९ लाख कोटींचे प्रकल्प व १० लाख नोकऱ्या भाजपा युती सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मागील दोन वर्षात सर्वच क्षेत्राच महाराष्ट्राची अधोगती झालेली असताना भाजपा सरकारने कोणते प्रगती पुस्तक जाहीर केले, असा सवाल करत मुंबईकरांचे जगणे कठीण झाले आहे, कधी होर्डींगच्या खाली उभे राहिलेल्या लोकांचा बळी जातो तर कधी रेल्वेतून पडून मृत्यू होत आहेत. रेल्वेतून पडून दररोज ७ लोकांचे मृत्यू होतात आणि भाजपा बुलेट ट्रेनची चर्चा करते. रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे, हिट अँड रन मध्ये कधीही कोणाचाही मृत्यू होऊ शकतो. मुंबईतील जमिनी विकल्या जात आहेत. महिलांच्या अत्याचारात महाराष्ट्राचा वरचा नंबर लागतो. महिला अत्याचार वाढत असताना शक्ती कायदा दोन वर्षापासून केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पडून आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, महात्मा ज्योतिबा फुले आयोग्य योजनेचे पैसे मिळत नाहीत, संजय गांधी निराधार योजनेतील पैसेही मिळत नाहीत. भाजपा युती सकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला असून या निवडणुकीत महाभ्रष्ट महायुतीचा सरकारचा पराभव करून महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास खा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष युती सरकारने धनगर समाजाची फसवणूक केल्याने भाजपाच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील यांनी यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त आदी उपस्थित होते.